मुंबई | 17 जुलै 2023 : आजपासून विधिमंडळाच्या अधिनेशनाला सुरूवात झाली आहे. अशात दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. विधानसभेत गोंधळ झाल्याने आजच्या दिवसभराचं कामकाज तहकूब करण्यात आलं. अशातच विधान परिषदेतील शिवसेनेच्या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाने विधीमंडळ सचिवांना पत्र पाठवून या तीन आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे.
मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे आणि आमदार विप्लव बजोरिया यांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. ठाकरे गटाने तसं पत्र विधीमंडळ सचिवांना लिहिलं आहे. शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी या सगळ्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
विधानभवनात जो काही तमाशा सुरू आहे आणि ज्या पद्धतीने नीलम गोऱ्हे यांना आणि मला टार्गेट केलं जात आहे. सूड भावनेतून हे सगळं केलं जातंय. पण या दबावाला आम्ही बळी पडणार नाही. आम्ही याला योग्य चोख उत्तर देऊ, असं मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
माझ्यापर्यंत अद्यापही ही नोटीस आलेली नाही. तर जेव्हा नोटीस येईल. त्यावेळी मी योग्य ते उत्तर देईल. पण जेव्हा आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत होतो. त्यावेळी आमच्यावर अन्याय झाला. आमच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. त्याबद्दल ते काही बोलत नाहीयेत. याची खंत वाटते, असंही मनिषा कायंदे यांनी सांगितलं आहे.
संजय राऊत काय म्हणताय याला काही अर्थ नाहीये. सत्ताधारी म्हणून आम्ही योग्य पद्धतीने इथे जनतेचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. जनेतेच्या प्रश्नांवर तोडगा निघेल. लोकांचे प्रश्न सोडवले जातील, असा आमचा विश्वास आहे, असंही मनिषा कायंदे यांनी म्हटलं आहे.
अजित पवार यांनी राज्य सरकारमधील राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनासोबत घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी शरद पवार यांना आपल्यासोबत येण्याची विनंती केली. सोबतच आजही अजित पवार गटातील 30 आमदार शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले आहेत. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ही भेट होत आहे. त्यावरही मनिषा कायंदे यांनी भाष्य केलंय.
अजितदादा हे मोठे नेते आहेत. ते त्यांच्या काकांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेले. पण सर्व नेते जर तिथे जात असतील तर ते त्यांना समजावण्यासाठी जात आहेत, असं मला वाटतं. भविष्यामध्ये तुम्ही पाहाल की बऱ्याच घडामोडी घडताना दिसतील, असे संकेत मनिषा कायंदे यांनी दिले आहेत.
आमचे जे सरकार आहे ते योग्य पद्धतीने इथे काम करत आहे. भविष्यात देखील बऱ्याच घडामोडी घडणार आहेत आणि अधिवेशनाच्या पूर्वी किंवा अधिवेशनानंतर त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतील, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.