मुंबई : राशीचक्रात ग्रहांची स्थिती कायमच बदलत असते. मग ती एका राशीतून दुसऱ्या राशीत असो की, एकाच राशीत अंशात्मक बदल असो. त्यात ग्रहांची विभागणी शुभ ग्रह आणि पाप ग्रहांमध्ये केली आहे. त्यामुळे त्या ग्रहांच्या गोचरासोबत मानवी जीवनावर परिणाम होतो, असं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून एप्रिल महिना खूप महत्त्वाचा आहे. कारण एप्रिल महिन्यात बरेच ग्रह राशी बदल करणार आहेत. त्यात शुभ अशुभ युती घडणार आहेत. तसेच काही अशुभ युती दीर्घ काळासाठी असणार आहेत. त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीतलावर दिसून येईल असं सांगण्यात येत आहे.
चंद्र हा सर्वात वेगाने फिरणार ग्रह आहे. एप्रिल महिन्यात 13 वेळा राशी बदल करणार आहे. त्यामुळे शुभ अशुभ युतींची सांगड दिसणार आहे. चंद्रामुळे ग्रहण योग, विष योग, गजकेसरी योग, कलात्मक योग, लक्ष्मी योग जुळून येणार आहे.
शुक्र ग्रह 6 एप्रिलला मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राची ही स्वरास असल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतील. या बदलाचा सर्व बारा राशींवर परिणाम होईल. मिथुन, वृश्चिक, धनु आणि मीन राशीला विशेष फायदा होईल.
बुध ग्रह मेष राशीत असणार आहे. त्यानंतर 25 एप्रिलला वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. मात्र तत्पूर्वी काही शुभ अशुभ युतींचा सामना करावा लागणार आहे. मेष राशीत राहु असल्याने बुधाची युती होणार आहे. बुध राहुच्या युतीला जडत्व योग संबोधलं जातं. ही युती 25 दिवस असणार आहे. वृषभ, कन्या आणि धनु राशीला याचा फटका बसेल.
सूर्य देव 14 एप्रिलला मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करतील. त्यामुळे मेष राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. 14 एप्रिल ते 22 एप्रिलपर्यंत त्रिग्रही योग असणारर आहे. राहु, बुध आणि सूर्याची युती असणार आहे. राहु आणि सूर्याच्या युतीमुळे ग्रहण असणार आहे. हा योग 15 मेपर्यंत राहील. तर बुध आणि सूर्याच्या युतीमुळे बुधादित्य योग राहील. हा योग 14 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंत राहील.
गुरु ग्रहात हा एप्रिल महिन्यातील सर्वात मोठा गोचर असणार आहे. 22 एप्रिलला मेष राशीत प्रवेश केल्याने शुभ अशुभ युतींची सांगड होणार आहे. चंद्राच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. पण हा योग फक्त दोन दिवस राहील. गुरु आणि राहुच्या युतीमुळे चांडाळ योग असणार आहे. हा अशुभ योग ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. गुरु आणि बुधाची युती चांगलं फळ देईल. पण 22 एप्रिल ते 25 एप्रिलपर्यंतच ही युती असणार आहे. गुरु आणि सूर्याची युतीही चांगलं फळ देते. ही युती देखील 15 मेपर्यंत असणार आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)