मुंबई : ग्रह नक्षत्रांप्रमाणे काही काळ पंचांगानुसार चांगलं करण्यासाठी उत्तम असतो. चैत्र नवरात्री हा पूजा पाठ आणि धार्मिक संकल्प सोडण्यासाठी उत्तम काळ आहे. चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेची पूजा आणि उपासना होते. नवरात्रीत नऊ दिवस खूपच महत्त्वाचे असतात. ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीत नवग्रहांची शांती करण्यासाठी चांगला काळ आहे. या काळात कुंडलीतील दोष दूर करण्यासाठी उपाय करता येतील. ज्या लोकांच्या कुंडलीत ग्रह दोष आहे अशा लोकांना या नऊ दिवसांचा फायदा करून घेता येईल.
ज्योतिषशास्त्रात राहु-केतु यांना पापग्रहाचा दर्जा देण्यात आला आहे. हे ग्रह दुसऱ्या ग्रहांसोबत एकत्र आले तर त्यांची स्थिती बिघडून टाकतात. इतकंच काय तर होणारी कामं देखील अडकून जातात. त्यामुळे ज्योतिष कुंडलीत राहु केतु यांचा दोष आहे का ते आधी पाहतात. त्यानंतर राहु-केतु शांतीचा उपाय सांगितला जातो. पण राहु केतु यांची शांती करण्यासाठी चैत्र नवरात्री उत्तम काळ आहे.
ज्या जातकांच्या कुंडलीत राहु-केतु संदर्भात दोष आहे. त्यांनी नवरात्रीत ब्रह्मचारिणी आणि चंद्रघंटा देवीची पूजा आराधना करावी. जेव्हा जातकांच्या कुंडलीत राहुसंदर्भात दोष असतो तेव्हा देवी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करावी. तर केतु संदर्भात दोष असल्यास चंद्रघंटा देवीची उपासना करावी.
नवरात्रीत देवी दुर्गेसोबत हनुमान आणि शंकराची पूजा करणं फलदायी मानलं जातं. यामुळे पाप ग्रह राहु आणि केतुच्या अशुभ प्रभावातून सुटका मिळते. नवरात्रीत हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठण करावं.
चैत्र नवरात्रीत देवी दुर्गेला प्रसन्न आणि जीवनात सुख समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी दुर्गा सप्तशतीचं पठण करावं. दुर्गा सप्तशतीच्या पठणामुळे नकारात्मक ऊर्जा संपून जाते. राहु केतुच्या प्रभावातून सुटका होते. तसेच देवी दुर्गेचा कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. दुर्गा सप्तशती पठणामुळे व्यक्तीला एक वेगळीच उर्जा प्राप्त होते.
नवरात्रीत काही वस्तू घरी आणून राहु केतुचा दोष कमी करू शकता. नवरात्रीत चांदीचा हत्ती आणून घरातील तिजोरीत किंवा पुजास्थळी ठेवावा. या उपयामुळे कुंडलीतील राहु केतु दोष संपून जाईल. तसेच जीवनात सुख समृद्धी प्राप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)