मुंबई : सनातन धर्मात आठवड्यातील सर्व दिवस कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित केले आहेत. यापैकी शनिवार हा शनिदेवाच्या पूजेचा दिवस मानला जातो. या दिवशी शनिदेवाच्या (Shanidev) मूर्तीला मोहरीचे तेल अर्पण केले जाते. पण प्रश्न पडतो फक्त मोहरीचेच तेल का? शनीदेवाच्या मूर्तीवर दुसरे तेल का वाहले जात नाही? त्याचा भगवान हनुमानाशी काय संबंध आहे? दोन्ही समान आहेत की भिन्न? आज आपण या रहस्यातून गूढ उकलणार आहोत.
पौराणिक ग्रंथानुसार शनिदेव हे सूर्याचे पुत्र आहेत. स्कंदपुराणानुसार, काशीखंडानुसार, सूर्यदेव आणि संवर्ण यांच्या मिलनातून शनिदेवाचा जन्म झाला. शनिदेव लहानपणापासूनच खोडकर होते आणि वडिलांच्या आज्ञेचे पालन करत नव्हते. यामुळे त्यांचे वडील म्हणजेच सूर्यदेव खूप नाराज झाले होते. भगवान हनुमान हे पवन देवाचे मानस पुत्र होते. त्यांचे गुरु सूर्यदेव होते. शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा हनुमानजींनी सूर्यदेवांना गुरु दक्षिणा मागायला सांगितली तेव्हा त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले आणि शनिदेवाला आपल्याकडे आणण्याची इच्छा व्यक्त केली.
पौराणिक कथांनुसार, आपल्या गुरूंच्या आज्ञेनुसार भगवान हनुमान शनिदेवाला आणण्यासाठी निघाले. त्यांनी शनिदेवांना वडील सूर्यदेव यांच्याकडे जाण्याची खूप विनंती केली पण ते मान्य झाले नाहीत. यानंतर दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. या युद्धात शनिदेव गंभीर जखमी झाले. त्यांना वेदना होत असल्याचे पाहून हनुमानजींनी त्यांना मोहरीचे तेल दिले, ते अंगावर लावताच शनीची वेदना नाहीशी झाली. यानंतर हनुमानजी त्यांना सोबत घेऊन सूर्यदेवाकडे पोहोचले, तिथे शनीने त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांची माफी मागितली.
यानंतर सूर्यदेवांनी हनुमानजींना आशीर्वाद दिला की जेव्हा शनिदेव कोणाला त्रास देतील तेव्हा हनुमानजींचे स्मरण केल्याने त्याचे सर्व दुःख दूर होईल. यानंतर शनिदेवाच्या साडेसातीपासून मुक्ती मिळण्यासाठी हनुमान चालिसाच्या पठणाची परंपरा सुरू झाली. तसेच शनिदेवाला प्रसन्न ठेवण्यासाठी आणि त्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून दर शनिवारी त्यांना मोहरीच्या तेलाने स्नान घालण्याची परंपराही सुरू झाली.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)