Shani : शनि 38 दिवस कुंभ राशीत जाणार अस्ताला, या राशींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता

| Updated on: Jan 19, 2024 | 3:48 PM

ज्योतिषशास्त्रानुसार अवकाशात होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम होत असतो. शनि देवांची स्थिती अशीच काहीशी असणार आहे. त्यामुळे तीन राशींच्या जातकांना 38 दिवसांचा कालावधी त्रासदायक जाणार आहे. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या त्या

Shani : शनि 38 दिवस कुंभ राशीत जाणार अस्ताला, या राशींचं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता
शनि
Follow us on

मुंबई : शनिदेवांची एकदा का एखाद्यावर नजर पडली की भल्याभल्यांची पायाखालची वाळू सरकते. त्यामुळे शनिचा प्रभाव कमी व्हावा यासाठी उपाय केले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव एका राशीत अडीच वर्ष राहतात. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. पण या कालावधीत त्यांचा प्रभाव मागच्या पुढच्या राशीवर असतो. त्याला ज्योतिषीय भाषेत साडेसाती संबोधलं जातं. तर शनिची चतुर्थ आणि अष्टम स्थानावर नजर असते. त्यामुळे या राशींवर शनिचा प्रभाव दिसून येतो. सध्या शनिदेव स्वत:च्या कुंभ राशीत विराजमान आहे. त्यात सूर्यदेव गोचर करत कुंभ राशीत येणार आहे. त्यामुळे शनिचं तेज कमी होणार आहे. अर्थात सूर्याच्या प्रभावामुळे शनिदेव अस्ताला जाणार आहे. शनिदेव 11 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकळी 6 वाजून 56 मिनिटांनी अस्ताला जातील. 38 दिवस शनि अस्त स्थितीत असणार आहे. 26 मार्चला सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी शनिचा उदय होईल. त्यामुळे या स्थितीचा फायदा काही राशींना होईल. तर काही राशींना त्रासाला सामोरं जावं लागेल. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींना फटका बसेल ते..

या तीन राशीच्या जातकांना बसेल फटका

कुंभ : या राशीच्या प्रथम स्थानात शनिदेव अस्ताला जाणार आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना बऱ्यापैकी फटका बसेल. एक तर सूर्य आणि शनिचं एकमेकांशी पटत नाही. त्यामुळे आत्मविश्वासात कमी जाणवेल. काही काम हाती घेण्यापूर्वी नकारात्मक विचार डोक्यात फिरत राहतील. एकंदरीत जीवनशैली एकदम धीमी झाल्याचं जाणवेल. काही होणारी कामंही आत्मविश्वासाच्या उणीवेमुळे होणार नाहीत. त्यामुळे 38 दिवसांच्या कालावधीत शनिची उपासना करणं उत्तम उपाय राहील. ॐ शं शनैश्चराय नमः मंत्राचा जाप करावा.

मकर : या राशीच्या दुसऱ्या म्हणजेच धन आणि वाणीच्या स्थानात शनि गोचर करत आहे. त्यात शनि अस्ताला जाणार असल्याने आर्थिक अडचणींना समोरं जावं लागेल. पैसा असूनही खर्च कसा होतो याचा तालमेल बसणार नाही. वारंवार पैशांची चणचण भासेल. त्यामुळे उसनवारी करण्याची वेळ येईल. त्यामुळे या कालावधीत मोठी आर्थिक व्यवहार करणं टाळा. 38 दिवसात येणाऱ्या प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात तिळाचा दिवा लावा.

वृश्चिक : या राशीच्या चतुर्थ स्थानात शनिचा गोचर होत आहे. अडीचकीमुळे शनिचा आधीच त्रास आहे. त्याच शनिदेव अस्ताला गेल्याने त्रास वाढणार आहे. कौटुंबिक स्तरावर अडचणींचा सामना करावा लागू शकतो. वारंवार अपमान सहन करावा लागू शकतो. त्यामुळे कौटुंबिक कार्यक्रमांना हजेरी लावण्याची इच्छाच उरणार नाही. शनिचालिसेच 38 दिवसांच्या कालावधीत पठण करावं. तसेच पिंपळ वृक्षाला जल अर्पण करून त्याखाली शनिवारी दिवा लावावा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)