मुंबई : ज्योतिषशास्त्रात, शनि (Shani Uday 2023) हा सर्वात कठोर आणि शक्तिशाली ग्रह म्हणून ओळखला जातो. सर्व ग्रहांमध्ये शनि हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे. शनीचा उदय आणि अस्त होणे देखील महत्त्वाचे मानले जाते, कारण ते सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर अनुकूल आणि प्रतिकूल पद्धतीने प्रभावित करते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा कोणताही ग्रह आपले स्थान बदलून राशी व नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव समस्त पृथ्वीवर व मानवांच्या आयुष्यावर दिसून येऊ शकतो. जेव्हा कोणताही ग्रह सूर्याच्या अधिक जवळ असतो तेव्हा त्याचा प्रभाव हा अस्ताला जात असतो ज्यामुळे ग्रहांची शक्ती कमी होऊ शकते. तर सूर्याच्या कक्षेपासून दूर गेल्यावर या ग्रहांचा उदय होऊन त्यांना शक्ती पुनर्प्राप्त होऊ शकते.
31 मार्चला न्यायदेवता शनी ग्रहाचा अस्त झाला होता तर आता होळीच्या आधी दोन दिवस शनिचा पुन्हा उदय होणार आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार 8 मार्च 2023 ला होळीचा सण आहे तर त्यापूर्वी 6 मार्च 2023 ला शनिदेवाचा उदय होणार आहे. शनीच्या सामर्थ्याने काही राशींना लवकरच भाग्योदयाची संधी आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे जाणून घेऊयात..
शनिदेवाचा उदय होताच वृषभ राशीच्या मंडळींसाठी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ सुरु होऊ शकतो. या राशीच्या मंडळींची अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही जर नव्या नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तुम्हाला विवाहाचा योग सुद्धा आहे.
ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार शनिदेवाचा उदय सिंह राशीसाठी धनलाभाचे योग घेऊन येत आहे. या मंडळींना येत्या काळात आर्थिक अडचणींमधून सुटका होण्याची शक्यता आहे. बँक बॅलन्समध्ये अनेक दिवसांनी मनसोक्त बचत जमा होऊ शकते. आरोग्यातही सुधारणेची संधी आहे.
तूळ राशीला शनिदेव उदय होऊन प्रगतीच्या संधी देणार आहेत. आतापर्यंत आपण ज्या समस्यांनी त्रस्त होतात त्यातून लवकरच बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. तुमचे शत्रू तुमच्या बाजूने उभे राहतील अशी काहीशी स्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कर्तृत्वाची वाहवा होऊ शकते. ज्या कर्जाच्या ओझ्याखाली आपण जगत होतात ते दूर होण्याचीही शक्यता आहे.
कुंभ रास ही 2023 ची सर्वात भाग्यवंत रास आहे असे म्हणायचे झाल्यास वावगं ठरणार नाही. आपल्या राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. अगोदरच शनी आपल्या राशीत स्थित आहेत आणि आता त्यांचे सामर्थ्य वाढल्याने येत्या काळात तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. पण आर्थिक फायद्यांसह खर्चात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)