मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवांचं विशेष असं महत्त्व आहे. शनिदेवांना ज्योतिषशास्त्रात न्यायदेवतेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे शनिदेवांची गोचर कालावधीनंतरची स्थिती कशी आहे याकडे ज्योतिषांचं लक्ष लागून असतं. 17 जानेवारी 2023 रोजी शनिदेवांनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश केला. त्यानंतर 30 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत अस्ताला गेले. आता 6 मार्च रोजी शनिदेव पुन्हा एकदा उदीत झाले आहेत. म्हणजेच सूर्यापासून लांब गेल्याने त्यांना तेज प्राप्त झालं आहे. त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे.
तीन राशींना अपार धन मिळण्याचा योग या काळात आहे. कारण शनिदेवांच्या उदयामुळे धन राजयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींसाठी हा काळ अनुकूळ असणार आहे. तसेच नोकरी आणि व्यवसायात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे.
वृषभ : शनिच्या उदीत अवस्थेमुळे या राशीच्या लोकांना करिअरमध्ये फायदा होईल. या राशीच्या जातकांना चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसेच सध्या करत असलेल्या नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती आणि चांगली पगारवाढ मिळू शकते. व्यवसायातही अपेक्षित लाभ होऊ शकतो. आर्थिक स्थिती सुधारल्याने कौटुंबिक वातावरणही चांगलं राहील. नव्या कामाची आणि गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. अविवाहीत लोकांची लग्न या काळात जमू शकतात.
सिंह : शनि उदयामुळे धन राजयोग तयार होत आहे आणि या योगाचा सिंह राशीच्या जातकांना सर्वाधिक फायदा होईल. या जातकांना अचानकपणे पैसे मिळू शकतात. तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. काही जुनी प्रकरणं मार्गी लागू शकतात. ज्या कामात हात घालाल त्यात अपेक्षित यश मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील आणि वडिलोपार्जित जमिनीतून फायदा होईल.
कुंभ : शनिदेव सध्या आपल्या स्वराशीतच अडीच वर्षांसाठी विराजमान आहे. त्यामुळे शनिदेवांना तेज मिळाल्याने धन राजयोगासोबत या राशीत शश राजयोगही तयार होत आहे. हे दोन्ही योग व्यक्तीला आर्थिक भरभराट देतात. साडेसातीच्या काळात या दोन योगांमुळे दिलासा मिळेल. धनलाभ होऊ शकतो आणि प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. तणावातून मुक्ती मिळेल. जुन्या आजारातून या काळात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)