मुंबई : मार्च महिन्यात ग्रहांची बरीच उलथापालथ होत आहे. अस्ताला गेलेल्या शनिदेवांचा उदय होणार आहे. तर मंगळ ग्रह 13 मार्चपर्यंत वृषभ राशीत असणार आहे. त्यानंतर मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह मीन राशीत 16 मार्चपर्यंत असेल आणि नंतर मेष राशीत प्रवेश करेल. रवि ग्रहही कुंभ राशीतून मीन राशीत 15 मार्चला प्रवेश करेल. असं असताना ज्योतिषांचं लक्ष शुक्राच्या गोचराकडे लागून आहे. कारण शुक्र ग्रह 12 मार्च मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींवर या गोचराचा सकारात्मक परिणाम दिसून येईल. तर काही राशींना या काळात अडचणींचा सामना करावा लागेल.
शुक्र ग्रहाला धन, वैभव, भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक ग्रह मानलं जातं. ज्या जातकांच्या कुंडलीत शुक्र ग्रह उच्च स्थानात असतो. त्यांना नावलौकीक मिळतो. शुक्र हा ग्रह वृषभ आणि तूळ राशीचा स्वामी आहे.मीन राशीत उच्च आणि कन्या राशीत नीच भावात स्थित असतो. शुक्र हा ग्रह हा शनि, बुध आणि राहु-केतुचा मित्र ग्रह आहे. बृहस्पतीसोबत या ग्रहाचं शत्रृत्वाचं नातं आहे. शुक्र एका राशीत जवळपास 23 दिवस राहतो. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शुक्र ग्रह अस्ताला गेला की कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही.चला जाणून घेऊयात कोणत्या तीन राशींना या गोचराचा लाभ होईल.
मीन : शुक्र गोचराचा सकारात्मक प्रभाव या राशीच्या जातकांवर पडणार आहे. या काळात व्यवसायिकांना चांगला फायदा होईल. अचानक धनलाभ देखील होऊ शकतो. मीडिया, वकिली आणि मार्केटिंग क्षेत्रात असलेल्या जातकांना निश्चितच फायदा होईल. मीन राशीत सध्या गुरु ग्रह असून शुक्र या राशीतून मेष राशीत गोचर करणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांना फायदा होईल.
कर्क : या राशीच्या जातकांना शुक्राच्या गोचरामुळे फायदा होईल. समाजात मानसन्मान मिळेल. तसेच कामाच्या ठिकाणी कामाचं कौतुक होईल. त्याचबरोबर अपेक्षित धनलाभ होऊ शकतो. कुटुंबाची या काळात चांगली साथ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना या काळात नोकरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
सिंह : शुक्राचा सर्वाधिक शुभ प्रभाव या राशीच्या जातकाना अनुभवता येईल. या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जातकांसाठी हा काळ चांगला असेल. कुंटुंबातही आनंदाचं वातावरण असेल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)