मुंबई : ग्रहमंडळात सूर्यदेवांना राजाचा दर्जा देण्यात आला आहे. एका राशीत सूर्यदेव महिनाभर राहतात. त्यानंतर दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे त्यांना राशीचक्रातील एका पुन्हा येण्यासाठी वर्षभराचा कालावधी लागतो. सध्या सूर्यदेव मेष राशीत असून राहुसोबतच्या युतीमुळे ग्रहण योग सुरू आहे. आता 15 मे 2023 रोजी सूर्यदेव मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करतील. या गोचराला वृषभ संक्रांती म्हंटलं जातं. या दिवशी ग्रहण योग देखील सुटणार आहे.
सूर्य गोचर 15 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजून 58 मिनिटांनी होईल. 15 मे ते 14 जूनपर्यंत सूर्यदेव वृषभ राशीत राहतील. त्यानंतर 15 जून 2023 रोजी संध्यााकळी 6 वाजून 29 मिनिटांनी मिथुन राशीत गोचर करतील. त्यामुळे काही राशींवर शुभ आणि काही राशींवर अशुभ परिणाम दिसून येईल.
कर्क : या राशीच्या एकादश भावात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे या जातकांची अडकलेली कामं मार्गी लागतील. तसेच उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. समाजात मानसन्मान प्राप्त होईल.
सिंह : या राशीच्या दशम भावात सूर्य गोचर करणार आहे. ही वेळ खूपच शुभ असणार आहे. प्रत्येक कामात सकारात्मक परिणाम दिसून येईल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या स्थितीचा लाभ मिळेल.
कन्या : या राशीच्या नवव्या भावात सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे आध्यात्मिक गोष्टींकडे कल वाढेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्साहवर्धक वाटेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली ऑफर मिळू शकते. या काळात नवीन काहीतरी शिकता येईल.
मकर : या राशीच्या पाचव्या स्थानात सूर्यदेव असतील. त्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात चांगला लाभ मिळेल. प्रेम प्रकरणात यश मिळू शकते. तसेच वैवाहिक जीवन चांगलं राहील. पण या काळात तब्येतीची काळजी घ्यावी लागेल.
सूर्यदेवांनी मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करताच वृषभ संक्रांती असेल. म्हणजेच 15 मे रोजी वृषभ संक्रांती आहे. या काळात सूर्यदेवाची पूजा केल्यास कुंडलीतील ग्रह दोष दूर होतो अशी मान्यता आहे. एकूण पुण्यकाळ 7 तास 3 मिनिटांसाठी आहे. पहाटे 4 वाजून 55 मिनिटे ते 11 वाजून 58 मिनिटांपर्यंत राहील.
वृषभ संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करा आणि पितरांना जल अर्पण करून तर्पण करा. तसेच दान करा. यामुळे पितृदोष दूर होतो. नदीवर जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर घरीच स्नान करा.
स्नानानंतर सूर्यदेवांना अर्घ्य द्या आणि पूजा करा. सूर्यदेवांच्या मंत्रांचा जप करा. सूर्य चालिसा आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पठण करा. त्यानंतर सूर्यदेवांची आरती करा. तसेच गुळ, गहू, तिळ, लाल कपडा, फळं यांचं दान करू शकता.
वृषभ संक्रांतीला सूर्याची पूजा केल्याने कुंडलीतील सूर्यदोष दूर होतो. स्नानानंतर पितरांन जल तर्पण केल्यास त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितरांसाठी दान केल्यास पुण्य आणि आशीर्वाद मिळतो. सूर्यदेवांशी निगडीत वस्तूंचं दान केल्यास कुंडलीतील सूर्य मजबूत होतो.