मुंबई – ज्योतिषशास्त्र आणि अवकाशातील ग्रह तारे यांचं घट्ट नातं आहे. एखादी खगोलीय घटना घडत असताना त्यावरून भाकीतं वर्तवली जातात. खगोलीय आणि ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिना खास असणार आहे. या महिन्यात ग्रहांची उलथापालथ, त्याचबरोबर शुभ-अशुभ युतींची सांगड दिसणार आहे. त्यामुळे त्याचा मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर परिणाम दिसून येईल. त्यात या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण असून मेष राशीत असणार आहे.
चंद्र पृथ्वीपासून लांब पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध येते तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण होतं.20 एप्रिलला असणारं सूर्य ग्रहण भारतातून दिसणार नाही. त्यामुळे सूतक काळ मान्य नसेल. पण त्याचा काही राशींवर परिणाम होईल. सूर्यग्रहण 20 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुपारी 12 वाजून 29 मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणात अवधी 5 तास 24 मिनिटं इतका असेल.
मेष – सूर्यग्रहण या राशीत होणार आहे. त्यामुळे या राशीच्या जातकांवार शारीरिक, मानसिक परिणाम दिसून येईल. या काळात आर्थिक अडचण प्रकर्षाने जाणवून येईल. पण गरज नसताना एखाद्याकडून पैशांची उसणवारी करू नका. त्यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकतं. एखादं सोपं काम करण्यासाठी तुम्हाला खूपच मेहनत करावी लागू शकते.
वृषभ – या राशीच्या बाराव्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानाला व्यय स्थान बोललं जातं. कर्ज, नुकसान, विदेशवारी, व्यसन,तुरुंगवास, गुप्त शत्रू याबाबत हे स्थान निगडीत आहे. त्यामुळे या काळात रागावर नियंत्रण ठेवा. कारण एखादी चूक तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्याने खर्चात वाढ होईल.
कन्या – या राशीच्या आठव्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानाला मृत्यू स्थान म्हटलं जातं. दुख आणि आर्थिक स्थितीबाबत सांगणार स्थान आहे. विनाकारण एखादा कौटुंबिक वाद उफाळून येईल. त्यामुळे घरी तणावपूर्ण स्थिती राहील. त्यामुळे प्रेमाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. या राशीच्या जातकांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. कारण एखादा जुना आजार त्रास देऊ शकतो.
मकर – या राशीच्या चौथ्या स्थानात सूर्यग्रहण होणार आहे. या स्थानातून मातृसुख, गृह सौख्य, मित्र आणि पोटाच्या आजारासंदर्भात माहिती मिळते. या काळात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. घरी किंवा मित्रांसोबत काही कारणांमुळे वाद होऊ शकतो. पोटासंदर्भात आजाराची काळजी घ्या. शक्यतो बाहेरचे अन्नपदार्थ खाणं टाळा.
मीन – ज्योतिषशास्त्रात द्वितीय स्थानाला धन स्थान बोललं जातं. व्यक्तीची आर्थिक स्थिती, कुटुंब सुख आणि घराच्या स्थितीबाबत माहिती मिळेस. या राशीच्या दुसऱ्या स्थानात सूर्यग्रहण असणार आहे. त्यामुळ आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे एखादी गुंतवणूक करताना काळजी घ्या. मोठी गुंतवणूक करणं या काळात टाळा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)