मुंबई : ज्योतिषशास्त्राचं गणित ग्रहांच्या स्थितीवर अवलंबून असतं. त्या ग्रहांच्या युती, आघाडी , अमावास्या, पौर्णिमा आणि ग्रहण सर्वात महत्त्वाचं ठरतं. चैत्र अमावस्येला या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण लागणार आहे. 20 एप्रिल 2023 रोजी गुरुवारी मेष राशीत पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. विशेष म्हणजे या राशीत आधीच राहु ग्रह विराजमान असल्याने विपरीत परिणाम दिसून येतील. सूर्य 15 मार्चपासून मीन राशीत विराजमान आहे आणि 14 एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मेष राशीत सूर्य आणि राहुची युती आणि ग्रहण एकाच वेळी होणार आहे.
सूर्य आणि राहुच्या युतीला ज्योतिषशास्त्रात ग्रहण योग म्हंटलं जातं. सूर्य आणि राहुची युती मेष राशीत 15 मे पर्यंत असणार आहे. त्यात मेष राशीत 20 एप्रिलला ग्रहण लागणार आहे. ग्रहण योग विनाशकारी मानला जातो.त्यामुळे या स्थितीचा फटका आरोग्यावर होईल.
गुरु ग्रहही सूर्यग्रहणानंतर मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे राहुच्या सान्निध्यात आल्याने गुरुची शक्ती कमी होईल. इतकंच काय तर ऑक्टोबर महिन्यापर्यंत चांडाळ योग निर्माण होणार आहे. हा अशुभ योग असल्याने जातकांना त्रास सहन करावा लागेल. तसेच शनि सुद्धा राहुच्या नक्षत्रात असल्याने विपरीत परिणाम दिसून येईल.
20 एप्रिलला सकाळी 7 वाजून 5 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 29 मिनिटांपर्यंत सूर्यग्रहण असणार आहे. सूतक कालावधी एकूण 5 तास 24 मिनिटांचाअसेल. ग्रहण भारतातून दिसणार नसल्याने सूतक काळ मान्य नसेल. असं असताना ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींवर वाईट प्रभाव दिसून येईल.
मेष – सूर्यग्रहण मेष राशीत असणार आहे. त्यामुळे या राशीवर सर्वाधिक परिणाम दिसून येईल. जातकांना मानसिक त्रास सहन करावा लागेल. त्यामुळे या काळात काळजी घेणं गरजेचं आहे. अपघाताची भीती असल्याने गाडी काळजीपूर्वक चालवा. शक्यतो लांबचा प्रवास टाळणं गरजेचं आहे.
कर्क – या राशीचा जातकांनाही ग्रहणाचा फटाक बसणार आहे. या काळात नाहक मानसिक त्रास सहन करावा लागेल. अचानक भीतीसारखं वाटेल आणि नकारात्मकता वाढेल. या काळात धीर धरा आणि दैवी उपासना करा.
वृश्चिक – या राशीच्या लोकांना या काळात अपमान सहन करावा लागेल. यासाठी वाणीवर नियंत्रण ठेवून काम करा. विचार करूनच एखाद्याला शब्द द्या. वादापासून लांब राहिलेलंच बरं असेल. खर्चात वाढ होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)