मुंबई : धनत्रयोदशीच्या (Dhanterasa 2023) सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारातून धातूची भांडी किंवा वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. प्रत्येक जण आपल्या ऐपताप्रमाणे सोने, चांदी, पितळ, स्टील किंवा तांब्याच्या वस्तू घरी आणतात. पंचांगानुसार, धनत्रयोदशी किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते. यावर्षी धनत्रयोदशी शुक्रवार, १० नोव्हेंबर रोजी येत आहे. धनत्रयोदशीला शुक्र आणि चंद्र कन्या राशीत असतील. याशिवाय शुभ नक्षत्रही असणार आहे. जोतिषी पराग कुळकर्णी यांच्याकडून जाणून घ्या यावर्षी धनत्रयोदशीला कोणते योग तयार होत आहेत आणि या दिवशी धनत्रयोदशीची पूजा कशी करता येईल.
पंचांगानुसार, कार्तिक महिन्याची त्रयोदशी तिथी शुक्रवार, 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:35 वाजता सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:57 वाजता समाप्त होईल. त्यामुळे 10 नोव्हेंबरलाच धनत्रयोदशी साजरी होणार आहे. यावेळी धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक योग तयार होत आहेत. या दिवशी हस्त नक्षत्र असल्याने भरपूर आर्थिक लाभ होईल. हस्त नक्षत्राचा स्वामी चंद्र देव असून शुक्र व चंद्र कन्या राशीत असतील. हस्त नक्षत्रात खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. याशिवाय धनत्रयोदशीच्या दिवशी शनि त्याच्या मूळ त्रिकोणी कुंभ राशीत त्याच्या थेट स्थितीत असेल.
धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. धन्वंतरी जयंतीही याच दिवशी येते. पूजेसाठी दिवे लावले जातात. संध्याकाळी पिठाच्या किंवा मातीच्या दिव्यात तेल ओतले जाते, त्यात चार दिवे लावून ते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवले जाते. या दिवशी दीपदानही केले जाते. धनत्रयोदशीची पूजा खरेदी केल्यानंतर केली जाते आणि भांडी, चांदी, सोने, वाहने, उपकरणे, कपडे, झाडू आणि मालमत्ता इत्यादी खरेदी करता येते.
धनत्रयोदशीच्या दिवशी 10 नोव्हेंबरला दुपारी 12.35 नंतर खरेदी करता येईल. या दिवशी प्रदोष व्रतही पाळले जाते. शुक्र प्रदोष व्रतामुळे लक्ष्मीसोबतच भगवान शिवाचीही पूजा करता येते. प्रदोष काळातील सर्वात शुभ मुहूर्त खरेदीसाठी देखील चांगला असतो आणि या वेळी धनत्रयोदशीची पूजा देखील करता येते. हा मुहूर्त संध्याकाळी 5:16 ते 7:54 पर्यंत राहील.
धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्दशी किंवा छोटी दिवाळी आणि 11 नोव्हेंबरला हनुमान जयंती, 12 नोव्हेंबरला दिवाळी आणि 12 नोव्हेंबरला गोवर्धन पूजा केली जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)