मुंबई : हिंदू धर्मात वास्तू शास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात (VastuShastra) घरातील अनेक गोष्टींसाठी योग्य दिशा आणि नियम सांगण्यात आले आहेत. वास्तूच्या नियमांचे (Vastu Tips) पालन केल्याने जीवनात सकारात्मकता येते आणि त्याचबरोबर शांती आणि समृद्धी येते. प्रत्येक वास्तू नियमामागे एक सखोल वैज्ञानिक कारण असते आणि म्हणूनच ते पाळले पाहिजे. येथे काही वास्तु टिप्स आहेत ज्यांचे तुम्ही पालन केल्यास तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा अबाधित राहील आणि त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक संकटासारख्या समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. जाणून घेऊया वास्तूशास्त्राच्या या नियमांबद्दल.
1. घराचा मुख्य दरवाजा पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे श्रेष्ठ राहते, परंतु असे नसेल तर घराच्या दरवाजावर स्वस्तिक, श्रीगणेशाचे चिन्ह लावावे.
2. घराच्या अंगणात दरवाजासमोर तुळस लावावी. सकाळी तुळशीला जल अर्पण करावे. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावावा. पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळस लावल्यास आत्मविश्वास वाढतो.
3. घरामध्ये खिडक्या, दरवाजांची संख्या सम असावी. सम म्हणजे 2, 4, 6, 8 किंवा 10. दरवाजे, खिडक्या घराच्या आतील बाजूस उघडली जातील अशी व्यवस्था करावी.
4. घरामध्ये व्यर्थ, जड सामान ठेवू नये. या वस्तूंमुळे घरातील तणाव वाढू शकतो.
5. आर्थिक लाभ प्राप्त करण्याची इच्छा असेल तर तिजोरीचे मुख उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे. धनाचे स्थान सुगंधित ठेवावे. यासाठी उदबत्ती, धूप, अत्तरचा उपयोग केला जाऊ शकतो.
6. तिजोरीच्या दरवाजावर कमळावर विराजमान असलेल्या महालक्ष्मीचा फोटो लावावा.
7. घराच्या दक्षिण दिशेला आरसा लावू नये. आरसा पूर्व किंवा उत्तर दिशेच्या भिंतीवर लावावा.
8. घराच्या भिंतीला भेगा पडल्या असतील त्या भरून घ्याव्यात.
9. घरामध्ये कोळ्याचे जाळे, घाण, कचरा होऊ देवू नये. यामुळे राहू ग्रहाचे अशुभ फळ प्राप्त होतात.
10. संध्याकाळी घरामध्ये अंधार राहणार नाही याची काळजी घ्यावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)