मुंबई : अदानी समुहाला देशाच्या इतिहासातला सर्वाधिक भांडवलाचा एफपीओ मागे घ्यावा लागलाय. शेअर बाजार तज्ज्ञ हा अदानी समुहासाठी धक्का मानतायत. ज्या लोकांनी अदानी समुहाचे एफपीओ खरेदी केले होते, त्यांचे पैसे अदानी समुहाकडून परत केले जाणार आहेत. या साऱ्या घडामोडींमागे हिंडेनबर्गच्या रिपोर्टची चर्चा होतेय. मात्र बाजारातली अस्थीरता, नैतिकता आणि गुंतवणूकदारांचं हित या 3 कारणांनी एफपीओ मागे घेतल्याचं अदानींनी म्हटलंय.
अदानी समुहासाठी गुंतवणूकादारांचं हित महत्वाचं आहे, असं सांगत अदानी समुहानं भारतीय शेअर बाजारातला ऐतिहासिक एफपीओ मागे घेतला. हा एफपीओ काय असतो. शेअर बाजाराचं गणित नेमकं कसं चालतं आणि मागच्या चार दिवसात शेअर बाजारात काय घडामोडी घडल्या.
आता एफपीओ किंवा आयपीओ काय असतो ते समजून घेण्याआधी काही मुलभूत गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टमध्ये नेमके आक्षेप काय, त्यावर अदानी समुहाचं स्पष्टीकरण. पाहण्याआधी शेअर बाजाराचं गणित समजून घ्यावं लागेल. शेअर बाजार काय असतो, कंपनी आयपीओ देते, किंवा लोक ते खरेदी करतात., त्यामागचं अर्थकारण कसं चालतं, ते ठळक मुद्द्यांनी समजून घेऊयात.
समजा अ नावाची एक कंपनी आहे जी पेन बनवते. त्या कंपनीकडे 2 कर्मचारी आणि 1 लाख रुपये भांडवल आहे. ग्राहकांच्या चांगल्या प्रतिसादामुळे कंपनीनं विस्तार वाढवण्याचं ठरवलंय म्हणजे कंपनीला आता मनुष्यबळ वाढवावं लागणार ज्यासाठी भांडवलाची गरज पडेल. अशावेळी कंपनी लोकांना प्रस्ताव देते की तुम्ही शेअर बाजाराद्वारे आमच्या कंपनीला भांडवलं द्या. त्यालाच आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर म्हटलं जातं.
समजा कंपनीनं त्यांच्या एका शेअरची किंमत 1 हजार रुपये ठरवली. ते शेअर शंभर लोकांनी खरेदी केले. तर कंपनीला शेअरमधून १ लाखांचं भांडवलं मिळतं. त्या भांडवलाच्या जोरावर कंपनी मनुष्यबळ वाढवून उत्पादन वाढवते. उत्पादन वाढीमुळे नफा वाढतो आणि त्या नफ्याबरोबर कंपनीचं मुल्य वाढल्यामुळे कंपनीच्या शेअरचीही किंमत वाढते मग आता समजा ज्या शंभर लोकांनी १ हजारांना प्रत्येकी एक-एक शेअर खरेदी केले होते. त्यांची किंमत वाढून पंधराशे रुपये झाली. तर शेअरधारकांना ५०० रुपयांचा फायदा मिळतो आणि कंपनीला भांडवलासोबतच विस्ताराची संधी मिळते. समजा भविष्यात कंपनीला पुन्हा भांडवलाची गरज पडली तर कंपनी पुन्हा गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचं आवाहन करते त्यालाच FPO म्हटलं जातं.
म्हणजे जेव्हा एखादी कंपनी पहिल्यांदा लोकांना शेअर खरेदीचं आवाहन करते त्याला इनिशियल पब्लिक ऑफर अर्थात IPO म्हणजेच सुरुवातीच्या काळातला शेअर खरेदीचा प्रस्ताव म्हटलं जातं. जेव्हा दुसऱ्यांदा तीच कंपनी शेअर खरेदीचं आवाहन करते, त्याला फॉलोऑन पब्लिक ऑफर अर्थात FPO म्हणजे पुन्हा शेअर खरेदीचा प्रस्ताव म्हटलं जातं हेच ढोबळमानानं शेअर बाजाराचं गणित असतं म्हणजे एखाद्या कंपनीची वाढ होत असेल, तर त्यांच्या शेअर्सची किंमत वाढते त्यातून शेअरधारक आणि कंपनीमालक दोघांचाही फायदा होतो, हाच मुलभूत नियम शेअर बाजाराचा आहे. शेअर बाजारातून दोन गोष्टी साध्य होतात. ते म्हणजे भांडवलासाठी कंपनीला कर्ज न काढता लोकांकडून बिनव्याजी पैसा मिळतो आणि लोकांनाही गुंतवलेल्या शेअर्सवर वाढीव परतावा भेटतो. मात्र हेच गणित अदानी समुहानं न पाळल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिपोर्टमधून झालाय.
हिंडेनबर्ग रिपोर्टचं म्हणणं आहे की अदानी समुहातली शेअर गुंतवणूक नियमानुसार नाहीय. ज्यांनी पैसा गुंतवला त्यांचा स्रोत नीटपणे देण्यात आलेला नाही. म्हणून अदानी समुहाचे वाढलेले शेअर्स हा फुगवटा आहे. यावर अदानी समुहाचं उत्तर आहे, की रिपोर्ट तथ्यहिन आहे. गुंतवणूकदारांचा आमच्यावर विश्वास असून. हिंडेनबर्ग रिपोर्ट खोट्या आणि पाश्चिमात्य कंपन्यांना आर्थिक फायदा देण्याच्या हेतूनं प्रेरित आहे. हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरुन संसदेतही गदारोळ झाला. हिंडेनबर्गच्या रिपोर्टवर सरकारनं भूमिका स्पष्ट करावी यासाठी विरोधक एकवटले होते. त्यामुळे दुपारी दोन्ही सभागृहांचं कामकाज स्थगित झालं. देशातला सर्वात मोठ्या उद्योग समुहावरच्या आरोपांवर सरकार गप्प का आहे, असा प्रश्न विरोधक करतायत.
दरम्यान, हिंडेनबर्गच्या रिपोर्टमुळे अदानी समुहाला मोठा फटका बसलाय. 23 जानेवारीला म्हणजे हिंडेनबर्गचा रिपोर्ट येण्याआधी अदानींच्या कंपन्यांचं मार्केट कॅप जवळपास 17 लाख 80 हजार कोटी होती. तेच मुल्य २ फेब्रुवारी दुपारी २ पर्यंत म्हणजे फक्त ९ दिवसातच 9 लाख 73 हजार कोटींवर आलंय म्हणजे अदानींच्या समुहाच्या मार्केट कॅपमध्ये जवळपास 8 लाख 5 कोटींचं नुकसान झालंय. आणि वैयक्तिक अदानींच्या संपत्तीत 6 लाख कोटींची घट झालीय.