मुंबई : राज्याच्या जडणघडणीचा इतिहास अभ्यासायचा असेल तर शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या योगदानाकडे कानाडोळा करुन चालणार नाही. मुंबईसारख्या शहरात मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरुन एक संघटना म्हणून नावारुपाला आलेल्या शिवसेनेने नंतर संपूर्ण राज्यामध्ये कसं प्रस्थ निर्माण केलं?, हे बहुतांश जणांना ठावूक आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांची बदलत गेलेली भूमिका यावर थोडा प्रकाश टाकूयात.
महाराष्ट्राच्या विकासाचा, सामाजिक, राजकीय जडणघडणीचा अभ्यास करायचा असेल तर शिवसेनेची बदलत गेलेली भूमिका आणि त्यामुळे राज्यात घडत गेलेल्या बदलाकडेही डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. शिवसेनेने सुरुवातीला मराठी माणसाची अस्मिता, त्यांचं अस्तित्व या मुद्द्यावरुन सामाजिक चळवळ उभी केली. राजकारणात महाराष्ट्रभर विस्तार करण्याच्या भूमिकेतून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने मराठीकडून आपला मोर्चा हिंदुत्वाकडे वळवला.
शिवसेनेचा उगम, प्रचार प्रसार हा मराठीच्या मुद्द्यावरुन झाला. मुंबई शहरात मराठी माणसांचं होत असलेलं दमन आणि मराठी अस्मिता याच गोष्टींना घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी सुरुवातीला शिवसेनेचा विस्तार केला. त्यासाठी त्यांनी आपले साप्ताहिक मार्मिकचा खुबीने वापर केला. मराठी माणसांच्या मनात मराठी अस्मिता जागवण्यासाठी बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये टोकदार शब्दांचा वापर केला. 1965 साली मार्मिकच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्तच्या संपादकीयात त्यांनी मराठी माणसाबद्दलची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. “मार्मिकची भूमिका स्पष्टपणे महाराष्ट्रप्रेमी आणि भारतनिष्ठेशी आहे. सामान्यांचा कैवार घेऊन आम्ही सतत लढणार आहोत. कोणी वंदा कोणी निंदा, महाराष्ट्र हिताचा आमुचा धंदा,” असं बाळासाहेबांनी मार्मिकमध्ये सांगितलेलं आहे. बाळासाहेबांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात ठाणे आणि मुंबईच्या पट्ट्यातील मराठी माणूस त्यांच्याकडे खेचला गेला. त्यानंतर 19 जून 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. शिवसेना स्थापनेचे मूळ हे मराठी अस्मिता होते. शिवसेनेच्या 1966 सालच्या प्रतिज्ञेवरुन आपल्याला त्याचा अंदाज येतो.
>>> मराठी माणसाच्या न्याय-हक्कासाठी शिवसेना लढेल
>>>शिवसेना मराठी माणसांना योग्य मान मिळवून देईल
>>> शिवसेना मराठी जनतेला एकत्र आणेल
>>> मुंबईत मराठी माणासाला 80 टक्के नोकऱ्या आणि 80 टक्के घरे मिळालीच पाहिजेत ही शिवसेनेची भूमिका आहे.
अशा प्रकारच्या काही प्रतिज्ञा शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात होत्या.
बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मुद्द्यावरुन मुंबई, ठाण्यातील तरुणांना एकत्र आणलं. मुंबई आणि उपनगरांत आपलं प्रस्थ निर्माण केल्यानंतर त्यांनी शिवसेनेला महाराष्ट्रभर वाढवण्याचं ठरवलं. मात्र, मुंबई आणि ठाणे हा भाग सोडून मराठीच्या मुद्द्यावरुन जनतेला एकत्र करणं जवळपास अश्यक्य होतं. 1985 मध्ये त्यांनी शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी प्रयत्नही सुरु केले. त्यासाठी शहारी, ग्रामीण आणि मध्यमवर्गीयांना आपाला वाटणारा एखादा समान मुद्दा हवा असं बाळासाहेबांना वाटू लागलं. अनेक विचाराअंती त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर जाण्याचा धाडसी निर्णय घेतला.
त्यानंतर 1985 नंतर बाळासाहेब हिंदुत्वाचा उल्लेख व्यासपीठावरुन जाहीरपणे करु लागले. त्या काळात मनोहर जोशी, विद्यमान सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ अशा तडफदार नेत्यांच्या मदतीने शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्याला घेऊन पुढे वाटचाल सुरु केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन शिवसेनेकडे तरुण मंडळी आकर्षित होऊ लागली आणि मराठवाड्यातील औरंगाबादपासून ते कोकणापर्यंत शिवसेनेचा विस्तार होऊ लागला.
दरम्यान, मराठी मुद्यापासून हिंदुत्वाकडे वळताना बाळासाहेंबाच्या विचारांमध्येही अनेक बदल झाले. त्यांच्या कपड्यांत भगवा रंगाचा समावेश झाला. हातात रुद्राक्षाची माळ, गळ्यात माळ, दसरा मेळावा असो किंवा इतर कोठलेही भाषण यावेळी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका ठळक दिसावी म्हणून विशेष काळजी घेतली जायची. मंच भगव्या रंगाने सजवला जायचा. या काळात बाळासाहेबांनी मराठी मुद्द्यावरुन हिंदुत्वाकडे केलेली वाटचाल जनतेनेही स्वीकारली. त्याचाच परिपाक म्हणून की काय, आज शिवसेना राज्याच्या सत्तेत असून संपूर्ण महाराष्ट्र सांभाळत आहे.
संबंधित बातम्या :
आज पाहायचे झाले तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसाऱख्या पुरोगामी, सेक्यूलर पक्षांसोबत सरकार स्थापन केल्यामुळो शिवसेनेला हिंदुत्वाचा मुद्दा तेवढा प्रखरपणे मांडण्यात थोडं जड जात असल्याचं राजकीय जाणकारांकडून सांगण्यात येतं.