Special Story | मोदी-ठाकरेंच्या वादात दिग्गज ‘पद्म’पासून वंचित राहिलेत का?

| Updated on: Jan 30, 2021 | 8:12 AM

महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांपैकी केवळ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाच पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्य सरकारने सुचवलेल्या शंभर नावांपैकी दहा मराठमोळ्या नावांच्या कारकीर्दीवर दृष्टीक्षेप (Padma Awards Thackeray vs Modi)

Special Story | मोदी-ठाकरेंच्या वादात दिग्गज पद्मपासून वंचित राहिलेत का?
Follow us on

प्रजासत्ताक दिनाच्या मुहुर्तावर केंद्र सरकारकडून 119 जणांना पद्म पुरस्कार जाहीर केले. यामध्ये महाराष्ट्रातील सहा दिग्गजांचा समावेश आहे. ठाकरे सरकारने पद्म पुरस्कारांसाठी जवळपास शंभर जणांची यादी पाठवली होती. मात्र शिफारस केलेल्या नावांपैकी केवळ एकाच व्यक्तिमत्त्वाचा ‘पद्म’ने सन्मान करण्यात आला. दिवंगत लेखक शं. ना. नवरे, कुस्तीपटू खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्म देण्याची मागणी सरकारने केली होती. तर कांगारुंना लोळवणाऱ्या टीम इंडियाचा कर्णधार अजिंक्य राहणे, नेमबाज अंजली भागवत, ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, विक्रम गोखले, रोहिणी हट्टंगडी, संगीतकार अशोक पत्की अशा विविध क्षेत्रातील 98 मान्यवरांच्या नावांची शिफारस राज्य सरकारने केंद्राकडे केली होती. परंतु मोदी सरकार आणि ठाकरे सरकार यांच्या वादात दिग्गज पद्मपासून वंचित राहत आहेत का, असा सवाल विचारला जात आहे. (Notable Person who went ignored in Padma Awards in Thackeray vs Modi)

महाविकास आघाडी सरकारने शिफारस केलेल्या नावांपैकी केवळ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनाच पद्म पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, सिंधुताई सपकाळ यांचा पद्मभूषणने सन्मान करण्याची शिफारस राज्य सरकारने केली होती. मात्र त्यांचाही पद्मश्रीने गौरव होणार आहे.

कोणाची कुठल्या पुरस्कारासाठी शिफारस?

पद्मविभूषण

सुनील गावसकर – 1980 मध्येच सुनील गावस्कर यांचा पद्मभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. भारतीय क्रिकेट संघाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल तत्कालीन राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या मालिकेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी असे नाव देण्यात आले आहे. गावस्करांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत दहा हजार धावांचा टप्पा पार केला आहे. हा मान मिळवणारे ते पहिलेच क्रिकेटपटू ठरले. सर्वाधिक कसोटी शतकं करणारे ते पहिले क्रिकेटपटू होते (सचिन तेंडुलकरने हा विक्रम नंतर मोडित काढला)

पद्मभूषण

सिंधुताई सपकाळ – अनाथांची माय अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी हजारो लेकरांचा सांभाळ केला आहे. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. 1994 मध्ये पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. त्यांनी अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. शिक्षण पूर्ण झाल्यावर संस्थेतील मुलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी मार्गदर्शन दिलं जातं. सुमारे 1050 मुले या संस्थेत राहिलेली आहेत

पद्मश्री

दादासाहेब रेगे (मरणोत्तर) – तळमळीला कल्पकतेची जोड देऊन त्यातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे शिक्षणतज्ज्ञ अशी दादासाहेबांची ओळख. दादासाहेब म्हणजेच शिवराम दत्तात्रय रेगे. 1940 मध्ये दादासाहेबांनी शिवाजी पार्कजवळ बालमोहन विद्यामंदिरची स्थापना केली. आठ विद्यार्थी आणि चार शिक्षकांच्या साथीने सुरु झालेल्या प्रवासाचा पाहता पाहता वटवृक्ष झाला. कला, क्रीडा, विज्ञान, उद्योग अशा अनेक क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी लौकिक मिळवला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही बालमोहनचेच विद्यार्थी. याशिवाय गायिका आशा भोसले, क्रिकेटपटू संदीप पाटील, अभिनेते अमोल पालेकर, मंत्री जयंत पाटील, मनसे अध्यक्ष राज ठाकरे असे अनेक दिग्गज बालमोहनमध्येच घडले.

खाशाबा जाधव (मरणोत्तर) – खाशाबा जाधव हे ऑलिम्पिक पदक विजेते मराठमोळे कुस्तीगीर होते. 1952 साली ऑलिम्पिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्री स्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. त्यांचा जन्म 1926 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील गोळेश्वर खेड्यात झाला. जाधवांच्या पद्म पुरस्कारासाची दीर्घकालीन मागणी आणि पाठपुरावा केला जात आहे. 2001 मध्ये त्यांना मानाचा अर्जुन पुरस्कार (मरणोत्तर) प्रदान झाला. जाधव हे पद्मपासून वंचित राहिलेल्या मोजक्या ऑलिम्पिक पदक विजेत्यांपैकी एक आहेत.

मसालाकिंग धनंजय दातार – कष्टांना प्रामाणिकपणाची जोड देत विदर्भातून थेट दुबईत झेप घेऊन डॉ. धनंजय दातार यांनी जगभरात नाव कमावलं आहे. ‘मसाला किंग’ म्हणून ते ख्यातकीर्त आहेत. अल अदिल ट्रेडिंग कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असलेले धनंजय दातार अनेकदा गरजूंना मदत करत असतात. डॉ. दातार यांनी सौदी अरेबियातील तुरुंगवासात अडकलेल्या 700 भारतीय कामगारांची सुखरुप सुटका केली होती. गेल्याच महिन्यात येमेनमध्ये 10 महिन्यांपासून अडकलेल्या 14 भारतीयांची त्यांनी सुटका केली. एडनच्या खाडीमध्ये जहाज दुर्घटनेनंतर फेब्रुवारी 2020 पासून 14 भारतीय येमेनमध्ये अडकले होते. दहावीत पाचवेळा नापास झालेले दातार गडगंज संपत्तीचे मालक आहेत. आखाती देशात त्यांनी 39 सुपरमार्केट्स उघडली असून अमेरिका, कॅनडा, इटली, स्वित्झर्लंड, टांझानिया अशा देशांमध्ये कंपनीचा विस्तार आहे.

दिलीप प्रभावळकर – दिलीप प्रभावळकर यांनी झपाटललेला, ‘चौकट राजा’ आणि ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात साकारलेल्या भूमिका गाजल्या आहेत. ‘श्रीयुत गंगाधर टिपरे’ मालिकेतील भूमिकेसाठी ते ओळखले जातात. त्यांनी साकारलेले चिमणरावही लोकप्रिय झाले. तर हसवाफसवी, वासूची सासू यासारख्या नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही फार गाजल्या. प्रभावळकर यांना 2006 मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी पुरस्कार मिळाला आहे. तेलगू रिमेक, शंकरदादा जिंदाबादमध्ये गांधींची भूमिका त्यांनीच केली. याशिवाय, प्रभावळकर यांनी अनेक नाटके आणि लहान मुलांसाठी पुस्तके लिहिली.

रोहिणी हट्टंगडी – रोहिणी हट्टंगडी यांनी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. रिचर्ड ॲटनबरो निर्मित ‘गांधी’ या चित्रपटातील ‘कस्तुरबा’च्या भूमिकेमुळे त्या आंतरराष्ट्रीय चित्रपट जगतात पोहोचल्या. एकच प्याला, मित्राची गोष्ट, रथचक्र, शांतता कोर्ट चालू आहे यासारख्या नाटकातील भूमिका गाजल्या. चार दिवस सासूचे या मालिकेत त्यांनी आशालता देशमुख ही भूमिका तब्बल दहा वर्ष साकारली. अग्निपथ, सारांश, अर्थपासून मुन्नाभाईपर्यंत अनेक हिंदी चित्रपटही त्यांनी केले आहेत. (Notable Person who went ignored in Padma Awards in Thackeray vs Modi)

अजिंक्य रहाणे – ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमीत लोळवून कसोटी मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं नेतृत्व अजिंक्यने केलं. 32 वर्षांच्या मुंबईकर क्रिकेटपटूच्या संयमी खेळीवर सारा देश फिदा आहे. पद्मसाठी शिफारस झाली, त्यावेळी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी व्हायची होती. परंतु नजीकच्या काळात रहाणेच्या योगदानासाठी पुरस्काराची मागणी होणार, यात शंका नाही

अंजली भागवत – अंजली भागवत ही व्यावसायिक नेमबाज आहे. अंजलीला नेमबाजीच्या क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा ISSF चा चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स हा पुरस्कार 2002 मध्ये म्युन्शेन येथे मिळाला. 2003 मध्ये मिलान येथे 399 गुण मिळवून तिने पहिला विश्वचषक जिंकला. तिने सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत ती अंतिम फेरीपर्यंत पोहोचली होती. कॉमनवेल्थ खेळात तिने बारा सुवर्ण आणि चार रौप्य पदके जिंकली आहेत. 10 मीटर एअर रायफल आणि स्पोर्ट्‌स रायफल 3 पी मध्ये तिचे कॉमनवेल्थ रेकॉर्ड आहे. 2003 मधील आफ्रो-आशियाई खेळांमध्ये, भागवतने अनुक्रमे क्रीडा 3 पी आणि एअर रायफल स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज बनून इतिहास रचला.

वीरधवल खाडे – वीरधवल खाडे हा ऑलिम्पिक स्पर्धांत भाग घेणारा एक मराठमोळा जलतरणपटू आहे. वयाच्या सतराव्या वर्षी तो पहिल्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्यावेळी तो वयाने सर्वात लहान जलतरणपटू होता. 2006 मधील आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये खाडेने तीन नवीन विक्रम नोंदवत सहा सुवर्णपदके जिंकली. चीनमधील बीजिंग येथे 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 50, 100 आणि 200 मीटरच्या फ्रीस्टाईल प्रकारात सहभाग घेतला. त्यापैकी 100 मीटरमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवला. त्यासाठी 50.07 सेकंदांचा वेळ देऊन त्याने स्वतःचाच विक्रम मोडला.

 

(Notable Person who went ignored in Padma Awards in Thackeray vs Modi)