मुंबई : कोरोना आला आणि सगळं जग ठप्प झालं. लॉकडाऊनमध्ये मनोरंजन क्षेत्र जवळजवळ 7 महिने बंद होतं, आता जग पूर्वपदावर येतंय मनोरंजन क्षेत्रसुद्धा जोमाने आपल्या कामाला लागलंय. मात्र कोरोनामुळे जगभरात बरेच बदल झाले आहेत, अगदी सिनेमा पाहण्याच्या पद्धतींमध्ये सुद्धा. जिथं लोक पूर्वी सिनेमागृहात जाऊन मोठ्या स्क्रिनवर चित्रपट पाहायचे, आता तो काळ बदलला आहे. चित्रपटगृहांमध्ये जाणारा प्रेक्षक आता स्वत:च्या घरातच फोनवर किंवा टीव्हीवर चित्रपट पाहातोय. चित्रपटाच्या प्रदर्शनाची पद्धतही बदलली आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आता नवनवीन चित्रपट प्रदर्शित होत आहेत.
तसेच चित्रपटाच्या कंटेंटवरही परिणाम झाला आहे, आधी चित्रपट तीन तास प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे, मात्र आता मोठमोठ्या वेब सीरिजनं लोकांची मनं जिंकली आहेत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चित्रपट प्रदर्शित करण्याच्या माध्यमापासून ते चित्रपटाच्या कंटेंटपर्यंत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. अशा परिस्थितीत चित्रपट निर्मात्यांना ओटीटीचा फायदा होत आहे की गरजेपोटी ते ओटीटीवर चित्रपट प्रदर्शित करत आहेत, असा प्रश्न उपस्थितीत होतोय. थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यात आणि ओटीटीवर प्रदर्शित करण्यात काय फरक जाणून घ्या…
कोणत्या प्लॅटफॉर्मवर जास्त कमाई ?
सध्या अनेक चित्रपट ओटीटीवर रिलीज होत आहेत. बरेच फिल्ममेकर्स गरजेपोटी ओटीटी प्लॅटफॉर्म वापरत आहेत, तर काही निर्माते ओटीटी डोळ्यासमोर ठेवून चित्रपट तयार करत आहेत. जर आपण या प्लॅटफॉर्मच्या फायद्यांबद्दल विचार केला तर थिएटरवर चित्रपट रिलीज करण्यात जास्त पैसे आहेत. चित्रपट वितरक, चित्रपट विश्लेषक आणि मल्टिप्लेक्स ओनर राज बन्सल यांनी टीव्ही 9 ला सांगितलं की जर एखादा चित्रपट चांगला चालला तर त्या चित्रपटाचे चित्रपटगृहांमध्ये अधिक पैसे मिळतात. ‘
कुठे चित्रपट रिलीज करणं सहज ?
जर आपण चित्रपटाच्या रिलीजबद्दल विचार केला तर ओटीटीवर चित्रपट रिलीज करणं सोपं आहे. यामध्ये चित्रपट निर्मात्यांना एकच करार करावा लागतो आणि चित्रपट देशभर रिलीज होतो. चित्रपटगृहांमध्ये चित्रपट रिलीज झाल्यावर वितरक इत्यादींशी बोलावं लागतं आणि स्लॉटवरदेखील वेळेची काळजी घ्यावी लागतं.
ओटीटीवर चित्रपट कसा रिलीज होतो?
ओटोटीवर चित्रपट रिलीज करण्यासाठी सुरुवातीला अप्लिकेशनच्या मॅनेजमेंटशी बोलावं लागत. त्यानंतर करारावर स्वाक्षरी केली जाते आणि डील अंतिम केली जाते. राज बंसल यांनी स्पष्ट केलंय की ओटीटी वर चित्रपट रिलीज केल्यास पैशाच्या आधारे नाही तर करारावर पैसे मिळतात. म्हणून या माध्यमात पैसा कमी मिळतो.
सिनेमागृहांमध्ये कशी कमाई होते?
चित्रपटगृहांमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाचा निर्णय तिकिटांच्या आधारे घेतला जातो. याचा एक भाग चित्रपट निर्मात्यांकडे जातो आणि चित्रपट प्रदर्शित करण्याचे वेगवेगळे नियम आहेत. राज बन्सल यांनी सांगितल्याप्रमाणे चित्रपट प्रदर्शित करण्याची पद्धत प्रत्येक राज्यात वेगळी असून प्रत्येक राज्याच्या नियमांनुसार करार केला जातो. यानंतर, वितरकांचा एक भाग, सर्व कर कमी केल्यानंतर चित्रपट प्रदर्शित होतो.
ओटीटी व्यवसाय वेगाने वाढतोय
PWC ग्लोबल एंटरटेनमेंट आणि मीडिया आऊटलुकच्या अहवालानुसार 2018 मध्ये ओटीटीचं मार्केट 4464 कोटी होतं आणि आता हे वाढून 2023पर्यंत ते 11976 कोटी होण्याची शक्यता आहे. भारतात नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारसह सुमारे 5 ते 6 हिट प्लॅटफॉर्म आहेत आणि त्यावरील वापरकर्त्यांची संख्या बरीच जास्त आहे.