शिर्डी, शिर्डीच्या साईबाबा मंदिराची दानपेटी उघडताच सर्वांना उत्सुकता लागलेली असते ती म्हणजे दानामध्ये मिळालेल्या रक्कमेचा आकडा किती आहे हे जाणून घेण्याची! (2022 Total Donation Shirdi) ही रक्कम इतकी जास्त असते की, ती मोजण्यासाठी अनेक लोकांना एकाच वेळेस काम करावे लागते. 2022 मध्ये साईंच्या दरबारात भक्तांनी त्यांच्या यथा शक्तिने दान केले आहे. या वर्षी श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट (SSST), शिर्डीला 400 कोटी रुपयांपेक्षा जास्त देणग्या मिळाल्या आहेत. सोने-चांदी, रोख रक्कम, चेक, ऑनलाइन पेमेंट अॅप आणि डिमांड ड्राफ्टद्वारे ही देणगी प्राप्त झाली आहे.
2022 मध्ये, कोविड महामारीमुळे लॉकडाऊन हटवल्यानंतर, साई मंदिरातील भक्तांची संख्या झपाट्याने वाढली. डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून मंदिरात दररोज 1 लाखाहून अधिक भाविक येत आहेत. 31 डिसेंबरला मंदिर रात्रभर उघडे राहिल्याने दर्शनार्थींची संख्या वाढली.
साईबाबा संस्थान ट्रस्टचे कार्यवाहक सीईओ राहुल जाधव म्हणाले की, मंदिर परिसरात ठेवलेल्या हुंडींमधून (दानपेटी) 166 कोटी रुपयांहून अधिक देणग्या रोख स्वरूपात मिळाल्या आहेत. ते म्हणाले, ‘ट्रस्टला डेबिट/क्रेडिट कार्ड, डिमांड ड्राफ्ट, चेक आणि ऑनलाइन व्यवहारांद्वारे देणगी देणाऱ्या भाविकांकडून 144 कोटींहून अधिक रुपये मिळाले.’
मंदिर परिसरात असलेल्या ट्रस्टच्या कॅश काउंटरवरही मोठ्या संख्येने भाविकांनी रोख दान केले आहे. कॅश काउंटरवर दिलेल्या देणगीची एकूण रक्कम 74 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. जाधव यांच्या म्हणण्यानुसार, 2022 मध्ये साईबाबांना 26 किलोपेक्षा जास्त सोने मिळाले होते, ज्याची किंमत 12 कोटींहून अधिक होती. त्याच वेळी, 330 किलोपेक्षा जास्त चांदी सापडली, ज्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे.
जाधव म्हणाले, ‘या देणगीमुळे SSST लोकांच्या हितासाठी सुरू असलेले सामाजिक कार्य पुढे चालू ठेवू शकेल.’ ते म्हणाले की ट्रस्ट दोन रुग्णालये चालवते जिथे रुग्णांना मोफत उपचार आणि औषधे दिली जातात. याव्यतिरिक्त, हे प्रसादालय चालवते जेथे दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांना मोफत भोजन दिले जाते.
जाधव म्हणाले, ‘ट्रस्टतर्फे मुलांना मोफत शिक्षणही दिले जाते. तसेच सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून या भागातील रस्त्यांच्या कामासाठीही पैसा वापरला जातो.