मुंबई | 22 ऑक्टोंबर 2023 : दुर्गा पूजेच्या नवव्या दिवशी दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणजे सिद्धीदात्री हिची पूजा केली जाते. सर्व प्रकारची सिद्धी देणारी ही देवी आहे. मार्कण्डेय पुराणात अणिमा, महिमा, गरीमा, लघिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व आणि वशित्व या आठ सिद्धी सांगितल्या आहेत. या सर्व सिद्धी भक्ताला प्रदान करण्याची शक्ती या देवीत आहे. या दिवशी शास्त्रोक्त विधी पूर्ण निष्ठेने करणाऱ्या साधकांना सर्व प्रकारची सिद्धी प्राप्त होते. ब्रह्मांडावर पूर्ण विजय मिळविण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येते.
भगवान शंकराने सिद्धीदात्री हिच्याच कृपेने सर्व सिद्धी प्राप्त केल्या होत्या. त्यामुळे शिवाचे अर्धे शरीर देवीसारखे झाले होते. हेच शिवाचे अर्धनारीनटेश्वर रूप. सिद्धीदात्री चार भुजाधारी आहे. तिचे वाहन सिंह आहे. या देवीच्या कृपेने संकटाचे निवारण होते. तो सुखाचा उपभोग घेऊ शकतो. नवदुर्गामध्ये देवी सिद्धीदात्री शेवटची देवी आहे. या देवीच्या उपासनेने साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
नवरात्रीमध्ये दुर्गा मातेची नववी शक्ती म्हणून सिद्धीदात्री हिची पूजा केली जाते त्याचप्रमाणे नवव्या दिवशी जांभळ्या रंगाची वस्त्रे परिधान केली जातात. जांभळ्या रंगाला सुंदर असा मखमालीचा भाव आहे. हा रंग स्वप्नांचा आहे. आशावादी भविष्याचा हा रंग. कलासक्त मनाचा निदर्शक, डोळ्यात अगणित स्वप्न आणि ती साकारण्यासाठी हळवं, आशावादी मन असणाऱ्या कलाकारांचा हा रंग
आपल्या देशातील 64 कलांपैकी स्थापत्य कला (Architecture), मूर्त्तिकला (Sculpture), चित्रकला (Painting), संगीत (Music), काव्य (Poetry), नृत्य (Dance), रंगमंच (Theater) हे मुख्य कला प्रकार मानले जातात. आधुनिकतेच्या काळात सिनेमा/अॅनिमेशन यासारख्या नखी काही कला त्यात सामावल्या जात आहेत. त्यामुळे आपलं आयुष्य अजून रंगीत होतंय.
आजवर अनेक स्त्री कलाकारांनी आपले आयुष्य समृद्ध केले. मग यात चित्रकार स्त्रिया येतील, स्थापत्यशास्त्र पारंगत असलेल्या स्त्रिया येतील. नाट्य दिग्दर्शका येतील, नाट्य कलाकार येतील. त्याचप्रमाणे लोककला जोपासणाऱ्या महिलाही येतील. अनेक शास्त्रीय नृत्यांगनांपासून ते सिने नृत्य पारंगत नट्यांपर्यंत ही यादी मोठी आहे.
अनेक मान्यवर लेखिका, कवयित्री आहेत. या आणि अशा सर्व स्त्री कलाकारांनी आपलं आयुष्य अधिक समृद्ध, देखणं केलं. या वेगळ्या वाटांवरून चालताना येणारी आव्हाने त्यांनी ताकदीने पेलली आहेत त्यामुळे स्त्री शक्तीला आनंद आणि समृद्ध करणारा असा हा जांभळा रंग आहे.