5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाची माहिती जाणून घ्या

| Updated on: Aug 23, 2021 | 11:50 AM

त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात.

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगात प्रसिद्ध असलेल्या या देवस्थानाची माहिती जाणून घ्या
Trimbakeshwar Shiva Temple
Follow us on

नाशिक : त्र्यंबकेश्वर हे नाशिक जवळचे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हिंदू तीर्थस्थान आहे आणि त्र्यंबकेश्वर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो. याच तीन आखाड्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये दर बारा वर्षांनी अर्ध सिंहस्थ कुंभमेळा भरतो. शैवांचे आखाडेही त्र्यंबकेश्वरात जमतात. हिंदू धर्मातील वैष्णवांमध्ये दिगंबर अनी, निर्वाणी अनी आणि निर्मोही अनी असे तीन आखाडे सर्वोच्च स्थानी आहेत. येथे निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर आहे. गोदावरी नदीचा उगम येथेच झाला.

त्र्यंबकेश्वरचे मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. पुरातन काळात बनलेले हे मंदिर आहे. मंदिराच्या पूर्वेला आपल्याला एक चौकोनी मंडप पाहायला मिळतो आणि मंदिराच्या चहूकडे चार दरवाजे आहेत. पश्चिमेला असलेला दरवाजा हा फक्त विशेष कार्यप्रसंगी उघडला जातो, बाकी दिवस भक्तगण बाकी तीन दरवाज्यांतून प्रवेश करुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ शकतात.

त्र्यंबकेश्वर येथे असलेलं मंदिर हे काळ्या शिळेपासून बनलेलं आहे. मंदिराची रचना अद्वितीय तसेच आकर्षक आहे. मंदिराच्या आतमध्ये एक गर्भगृह आहे आणि त्या गर्भगृहामध्ये शिवलिंग आहे. आपल्याला ते डोळ्यांच्या आकाराचे दिसत आणि त्यामध्ये पाणी भरलेलं असत, जेव्हा आपण लक्षपूर्वक बघितले तर त्यामध्ये आपल्याला तीन छोटे छोटे लिंग दिसतात त्या लिंगांना ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचा अवतार मानले जातं.

त्र्यंबकेश्वर हे शहर भारत देशाच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 28 कि.मी. अंतरावर असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आहे. मुंबई पासून 165 कि.मी. अंतरावर असून जाण्यसाठी कसारा घाटातून इगतपूरी मार्गे तसेच भिवंडी – [वाडा] मार्गे खोडाळ्यावरुन जाता येते. हे शहर समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंचीवर आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिर इतिहास

दहाव्या शतकातील शिलाहार राजा झंझ याने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या बारा नद्यांच्या उगमस्थळी एकूण बारा शिवालये बांधली. त्यांतील एक हे शिवालय आहे.

गोदावरी नदीच्या उगमाशी त्र्यंबकेश्वर, वाकी नदीच्या उगमाशेजारचे त्रिंगलवाडीतले शिवालय, धारणा नदीच्या उगमाशेजारचे -तऱ्हेळे येथे, बाम नदीच्या उगमाशेजारचे – बेलगावला, कडवा नदीच्या उगमाशेजारचे – टाकेदला, प्रवरा नदीच्या उगमाशेजारी – रतनवाडीतील अमृतेश्वर, मुळाउगमस्थानी असलेल्या – हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर, पुष्पावतीजवळ – खिरेश्वरातील नागेश्वर, कुकडीजवळ्च्या – पूरमधील कुकडेश्वर, मीना नदीच्या उगमाशेजारच्या – पारुंडेतील ब्रह्मनाथ, घोड नदीच्या उगमस्थानी – वचपे गावातील सिद्धेश्वर आणि भीमा नदीजवळचे -भवरगिरी. ही सर्व मंदिरे शिल्प सौंदर्याने नटलेली आहेत, कोरीव कलेने सजलेली आहेत.

नानासाहेब पेशवे यांनी इ.स. 1755-1786 या कालावधीत हेमांडपंती स्थापत्यशैलीत श्री त्र्यंबकेश्वर मंदिर नव्याने बांधले. भारत सरकारने या मंदिराला दिनांक 30 एप्रिल इ.स. 1941 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.

मंदिराच्या कळसावर पाच सुवर्णकलश असून ध्वजा पंचधातूंची आहे. कलश आणि ध्वजा अण्णासाहेब विंचुरकरांनी अर्पण केली आहे. मंदिराच्या बाजूस असलेल्या कुशावर्त तीर्थाचा जीर्णोद्धार होळकरांचे फडणीस असलेल्या पारनेरकरांनी केला.

बाराही महिने भाविकांची गर्दी

ब्रह्मगिरी पर्वताच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र असल्याने तेथे बाराही महिने भाविकांचा मोठा राबता असतो. श्रावण महिन्यात ही गर्दी अधिकच वाढते. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये लक्षावधी भाविक हजेरी लावतात. श्रावण महिन्यातील पहिल्या तीन सोमवारी त्र्यंबकेश्वरास भाविकांची गर्दी वाढत जाते.

भारतात फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच नारायण नागबली, त्रिपिंडी, कालसर्प शांती, विष्णुबली, उत्तरक्रिया, लघुरुद्र, जननशांती, सिंहस्थसिन्हास्त विधी, हे धार्मिक विधी केले जातात .

गावात अनेक प्राचीन देवळे आहेत. त्यावरील कोरीवकाम पाहण्याजोगे आहे. गावामध्ये राहण्याची उत्तम व्यवस्था आहे. नाशिकहून दर तासाला बसगाड्यांची सोय आहे. येथून ठाणे जिल्ह्यातील जव्हार येथे जाणारा नयनरम्य असा घाट रस्ता आहे.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ, जाणून घ्या या जागृत देवस्थानाची माहिती

Photo : श्रावणातील तिसरा सोमवार, विठ्ठल मंदिराला फुलांची आरास, पांडुरंगाचं गोजिरं रुप!