आषाढी एकादशीची (Ashadhi ekadashi 2022) महापूजा (Pandharpur Mahapuja) संपन्न करण्याचा मान यंदा चार पुजारी मंडळींना मिळाला आहे. या पूजेचं एक वेगळे पण असते. आषाढी एकादशीची महापूजा ही महत्वाची असते. कारण या दिवशी महाराष्ट्रातील कोट्यवधी जनतेचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री ही पूजा करतात. यंदा महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ही पूजा पार पडणार आहे. याशिवाय वारीमध्ये आलेल्या एका जोडप्याला मुख्यमंत्र्यांसोबत पूजा करण्याचा मान मिळतो. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील संदीप कुलकर्णी, कृष्णा नामदास ,सुनील गुरव, आष्टेकर हे पुजारी ही एकादशीची महापूजा संपन्न करतील. मंदिर व्यवस्थापनाकडून महापूजेची तयारी पुर्ण झाली आहे.
या एकादशीला देवशयनी एकादशीसुद्धा म्हणतात. त्याचे कारण म्हणजे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो अशी मान्यता आहे. आषाढ महिन्यात येणार्या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी म्हणजेच देवांच्या निद्रेची एकादशी असे म्हणतात. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात व मानवाला त्रास देऊ लागतात. त्या असुरांपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत व साधना करणे आवश्यक असते. या दिवशी रोजच्या पुजेबरोबरच श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याची पद्धत आहे. तसेच घरात विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती किंवा प्रतिमा असल्यास त्याचीही मनोभावे पूजा केली जाते. वारकरी संप्रदायात पंढरपूरची वारी करण्याला विशेष महत्त्व आहे.