मुंबई : जयपूर शहरातील अरवली पर्वतरांगांवर असलेले देशातील एकमेव मंदिर, जिथे सोंडेशिवाय गणेशाची मूर्ती (Arawali Ganesh Mandir) आहे. हे मंदिर गड गणेश या नावाने प्रसिद्ध आहे. 18व्या शतकात जयपूरच्या स्थापनेसाठी सवाई जयसिंग यांनी गुजरातमधून खास पंडितांना बोलावून अश्वमेध यज्ञ केला होता. जयपूरची पायाभरणी करताना बालरूप गणेशाची मूर्ती बनवून पूजा करण्यात आली. याच गणपतीची मूर्ती शहराच्या उत्तरेकडील अरवलीच्या टेकडीवर किल्ला (गड) बांधून विराजमान करण्यात आली. सवाई जयसिंग आणि यज्ञ करणार्या पुजाऱ्यांचा असा विश्वास होता की यामुळे श्री गणेशाची नजर संपूर्ण शहरावर राहील. त्यांचे आशीर्वाद मिळतील.
तज्ञांच्या मते, सुमारे 500 फूट उंचीवर बांधलेल्या गड गणेश मंदिरापर्यंत जाण्यासाठी दररोज एक पायरी बांधली जात होती. अशा प्रकारे, प्रत्येक सगळ्या पायऱ्या बांधण्यासाठी संपूर्ण 365 दिवस लागले. आजही बाप्पाच्या मंदिरात भक्त दूरवरून येतात. हा गणपती नवसाला पावतो अशी मान्यता आहे. या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला सोंड नाही, कारण तो बाल रूपात आहे.
या मंदिराच्या स्थापनेनंतर येथे छायाचित्रण करण्यास बंदी घालण्यात आली. मंदिराच्या गर्भगृहातील मूर्तीचे कधीही छायाचित्रण करण्यात आले नव्हते. अशा स्थितीत मंदिराच्या स्थापनेला जवळपास 300 वर्षे उलटून गेल्यानंतरही श्रीगणेशाचा एकही फोटो उपलब्ध नाही. भक्तांना फक्त दर्शन घेता येते.
मंदिराची खास गोष्ट म्हणजे सवाई जयसिंगच्या वास्तुविशारदांनी हे मंदिर अशा ठिकाणी बांधले की, राजा सिटी पॅलेसमधून उभा राहून दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या आरतीच्या वेळी मंदिर पाहू शकत होते. गड गणेश, गोविंद देव मंदिर, सिटी पॅलेस आणि अल्बर्ट हॉल हे टेकडीवर एकाच दिशेने एकमेकांना समांतर बांधले गेले. नियमित भेट देणाऱ्या भाविकांची अशी श्रद्धा आहे की गढ गणेशाकडून मागितलेली प्रत्येक इच्छा बुधवारच्या सात वाऱ्या केल्याने पूर्ण होते. मंदिराच्या आवारात पायऱ्या चढताना मुख्य प्रवेशद्वारावर दोन उंदीरही बसवले आहेत, ज्यांच्या कानात भाविक आपली इच्छा सांगतात. उंदीर त्या प्रार्थना बाल गणेशापर्यंत पोहचवतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)