मुंबई, सूर्य धनु राशित प्रवेश करतो तेथून सुर्य मकर राशीत प्रवेश करतो तोपर्यंतचा काळ हा धनुर्मास (Dhanurmas 2023) म्हणून ओळखला जातो. यास धुंधुरमास असेही म्हणतात. याला धुंधुरमासा बरोबर झुंझुरमास अथवा शून्यमास असेही म्हणतात. असे म्हणतात की दक्षिणायनाचे सहा महिने देवतांची रात्र असते व उत्तराणायचे सहा महिने देवतांचा दिवस असतो आणि हा धुंधुरमास देवतांचा ब्रह्ममुहूर्त म्हणजेच त्यांची पहाट असते.
या मासात लग्नकार्ये, प्रॉपर्टी खरेदी इत्यादी शुभकार्ये करत नाहीत. हा संपूर्ण महिना आपल्या देव देवतांचे प्रती अर्पण असतो.
धार्मिक मान्यतेनुसार यावेळी धर्म, तपस्या आणि उपासनेनुसार मनुष्याची परीक्षा होते. धनुसंक्रांतीच्या प्रदक्षिणा कालावधीत, भक्त सनातन धर्माचे पालन करतात आणि भागवताचा अखंड जप करतात आणि त्यांची आध्यात्मिक साधना तसेच उपासना करतात. याद्वारे भक्तांना आदित्यलोकाची प्राप्ती होते असे मानले जाते.
15 डिसेंबर धनुर्मास प्रारंभ होतोय. महिनाभर म्हणजेच 14 जानेवारी पर्यंत धनुर्मास कायम राहील. त्यानंतर सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. याला मकर संक्रांत म्हणतात.
हिंदू धर्मात पौष महिन्यात सूर्य उपासनेचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशी धार्मिक मान्यता आहे. शरीर निरोगी होते. शौर्य आणि कुशाग्रता विकसित होते. धनुसंक्रांती पौष महिन्यात येते. म्हणूनच पौष महिन्यात सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व दिले गेले आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)