मुंबई : श्री रामजन्मभूमी तीर्थ न्यास समितीची 2 दिवसीय बैठक शुक्रवारपासून सुरू झाली असून, त्यानंतर खन्ना यांचे ट्विट समोर आले आहे. राम मंदिरात (Ayodhya Ram Mandir) नवीन आणि जुन्या अशा दोन्ही प्रकारच्या राम मूर्ती बसवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अयोध्येत रामललाचा अभिषेक 22 जानेवारी 2024 रोजी निर्माणाधीन राम मंदिरात होणार आहे. याबाबतची माहिती उत्तर प्रदेशचे अर्थ आणि संसदीय कामकाज मंत्री सुरेश कुमार खन्ना यांनी ट्विट करून दिली. मंत्री सुरेश खन्ना यांनी ट्विट केले की, “22 जानेवारीला गर्भगृहात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. जय श्री राम”. यावेळी पंतप्रधान मोदीही उपस्थित राहतील, अशी अपेक्षा ट्रस्टने व्यक्त केली आहे. सध्या राम मंदिराचे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे.
राम मंदिराचे गर्भगृह अशा प्रकारे बांधले जात आहे की रामनवमीच्या दिवशी सूर्यकिरणे थेट रामललाच्या मूर्तीला अभिषेक करतात. त्यादिवशी सूर्याची किरणे श्रीरामाच्या कपाळावर 15 मिनिटे राहतील. त्याला ‘सूर्य टिळक’ असे म्हणतात.
राम आणि माता सीता यांच्या मूर्ती बनवण्यासाठी शालिग्राम दगडांचा वापर करण्यात आला आहे. मूर्ती बनवण्यासाठी वापरलेले दगड नेपाळमधून आणण्यात आले आहेत. हे दगड सुमारे 600 वर्षे जुने आहेत आणि नेपाळमधील काली गंडकी नदीत सापडले आहेत. रामाच्या मूर्तीची उंची 5 ते 5.5 फूट असेल. रामाची उंची अशा प्रकारे निवडण्यात आली आहे की रामनवमीच्या दिवशी सूर्याची किरणे थेट रामाच्या कपाळावर पडतील. तत्पूर्वी, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राचे खजिनदार स्वामी गोविंद देव गिरी महाराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिरात रामललाची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा होण्याची शक्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)