मुंबई : अनेक ठिकाणी भव्य दरबार भरवून लोकांच्या मनातले सांगणारे बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) यांनी आज देहू येथे संत तूकाराम महाराजांचे दर्शन घेतले. बागेश्वर बाबा यांनी काही दिवसांआधी संत तुकाराम महाराजांना त्यांची पत्नी मारायची असे वादग्रस्त वक्यव्य केले होते. यानंतर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून युटर्न घेत जाहीर माफी मागितली होती. सध्या पुण्यात बागेश्वर बाबाचा दरबार भरला आहे. या दरबारात अनेक राजकीय नेतेही आपली हजेरी लावताना दिसत आहे.
बागेश्वर बाबा यांनी देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचे कौतूक केले. काही दिवसांआधी त्यांनी संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावर त्यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, तुकाराम महाराजांबद्दल तसं माझ्या बाचण्यात आले होते म्हणून मी ते बोललो असं ते म्हणाले. यासाठी मी पुन्हा एकदा समस्त वारकरी सांप्रदायाची माफी मागतो असं बागेश्वर बाबा म्हणाले. आज देहू येथे बागेश्वर बाबा येणार असल्याने पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.