मुंबई : शीख समाजाच्या नवीन वर्षाची सुरुवात बैसाखीपासून होते. देशातील अनेक राज्यांमध्ये बैसाखी सण (Baisakhi 2023) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पंजाब, हरियाणा आणि दिल्लीत बैसाखीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वैशाख महिन्यात बैसाखी हा सण साजरा केला जातो. वैशाख महिन्यापर्यंत रब्बी पिके पक्व होतात आणि या दिवशी धान्याचे पूजन करून त्यांच्या चांगल्या उत्पादनासाठी परमेश्वराचे आभार मानले जातात. पंजाबी समाजासाठी विशेषत: शीख समुदायासाठी हा अतिशय महत्त्वाचा सण आहे. या दिवशी लोकं नवीन कपडे घालतात आणि एकमेकांचे अभिनंदन करतीत शुभेच्छा देतात. यावर्षी बैसाखीचा (Vaishakhi 2023) सण कधी आहे? तारीख आणि महत्त्व जाणून घेऊया.
शीख समाजातील लोकं हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात. हा सण विशेषतः पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये साजरा केला जातो. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. त्याला आसाममध्ये बिहू, बंगालमध्ये नबा वर्षा, केरळमध्ये पूरम विशू म्हणतात.
सूर्याचा मेष राशीत प्रवेश मेष संक्रांती म्हणून ओळखला जातो. यावेळी 14 एप्रिल रोजी सूर्याचे मेष राशीत संक्रमण होत आहे. अशा परिस्थितीत यंदा 14 एप्रिलला बैसाखीचा सण साजरा होणार आहे. हिंदू सौर कॅलेंडरनुसार, बैसाखी हा सण शीख नववर्ष म्हणून साजरा केला जातो.
हा सण साजरा करण्यामागचे एक कारण म्हणजे या दिवशी दहावे शीख गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली. याशिवाय महाराजा रणजित सिंग यांना बैसाखीच्या दिवशी शीख साम्राज्याची जबाबदारी देण्यात आली होती. ज्याने एकत्रित राज्याची स्थापना केली. तेव्हापासून ती बैसाखी म्हणून साजरी केली जाते.
या दिवशी शेतकरी संपूर्ण वर्षभर भरपूर पीक मिळाल्याबद्दल देवाची कृतज्ञता व्यक्त करतात आणि पूजा करतात. बैसाखीच्या दिवशी पिकांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी लोकं पवित्र नद्यांमध्ये स्नान करून बैसाखी साजरी करतात. बैसाखीच्या दिवशी सूर्यदेवाला पवित्र स्नान, दान आणि अर्घ्य दिल्याने सुख-समृद्धी प्राप्त होते. बैसाखीच्या दिवशी पिकाचा थोडासा भाग गरजूंना दान केला जातो, खीर आणि शरबत गरीबांना वाटले जाते. या दिवशी लोकसेवा केल्याने आशीर्वाद प्राप्त होतात आणि गरिबी दूर होते, अशी मान्यता आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)