वाराणसी, उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये गंगा घाटाच्या किनारी एक ‘टेंट सिटी’ (Banaras Tent City) उभारली जात आहे, ज्यासाठी बनारसच्या लोकांसह देशभरातील लोकं खूप उत्सुक आहेत. काशी-विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी टेंट सिटीची कल्पना केली होती, जी प्रत्यक्षात येत आहे. आज 13 जानेवारीला पंतप्रधान मोदी या टेंट सिटीचे उद्घाटन करणार आहेत. प्रकल्पांतर्गत गंगेच्या वाळवंटावर 100 एकरात 600 तंबू बांधले जाणार आहेत. पण, पहिल्याच वर्षी 270 तंबू बनवण्यात आले आहेत. गंगा किणारी वसलेल्या टेंट सिटीशी संबंधित सर्व खास गोष्टी आज जाणून घेऊया.
वाराणसीतील वाढते पर्यटन लक्षात घेऊन गंगा घाटाच्या पलीकडे वाळूवर टेंट सिटी उभारण्यात येत आहे. हे टेंट सिटी तीन प्रकारात बनवण्यात येत आहे. यात 150 खोल्या असतील, जे पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नसतील. येथे राहणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे.
टेंट सिटीमध्ये पोहोचणाऱ्या पर्यटकांचे जंगी स्वागत केले जाईल. त्यांच्या स्वागतासाठी बनारसी शैलीत ढोल वाजवले जाणार आहेत. पर्यटकांची आरती केली जाईल, त्यानंतर टिळा लावून स्वागत केले जाईल आणि शेवटी पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप देण्यात येईल.
टेंट सिटीमध्ये पर्यटकांना पंचतारांकित हॉटेल्ससारख्या लक्झरी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. टेंट सिटीमध्ये वेगवेगळे व्हिला बांधले जात आहेत. इको फ्रेंडली टेंट सिटीमध्ये पर्यटकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात आली आहे. येथे योग आणि ध्यान केंद्र बांधले जात आहे. एका वेळी किमान तीनशे पर्यटक योगासने आणि ध्यान करू शकतील.
टेंट सिटी उभारणाऱ्या कंपनीचे मॅनेजरने सांगितले की, टेंट सिटीचे वातावरण तुमच्या पाचही इंद्रियांना जाणवेल अशा पद्धतीने ठेवण्यात आले आहे. मंडपातून बाहेर पडताच सूर्योदय, माता गंगा आणि अर्धा चंद्र घाट तसेच गंगा आरतीचे दृश्य दिसेल.
सूर्योदय होताच घंटानादासह गंगा आरती होईल. सकाळची सुरुवात संगीत रागाने होईल. बनारस घराण्याच्या जवळपास सर्वच वाद्यांचे मधुर सूर पर्यटकांना ऐकता येणार आहेत. यामध्ये विशेषत: शहनाई, सारंगी, सतार, संतूर आणि तबल्याचा ताल ऐकू येईल.
काशीचे प्रतिबिंब तंबूनगरीत दिसेल. येथे पर्यटक सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत बनारसी चवीचा आस्वाद घेतील. मलायो, थंडाई, चाट, बनारसी पान आणि बनारसी मिठाई पर्यटकांना दिली जाईल. नॉनव्हेज खाण्यावर आणि दारू पिण्यावर पूर्ण बंदी असेल.
अस्सी घाटासमोरील टेंट सिटीमध्ये तीन क्लस्टरमध्ये 600 तंबू विकसित केले आहेत. 10 हेक्टर परिसरात गंगा नदीच्या काठावर नागरी सुविधांसह पर्यटकांसाठी क्लब हाऊस तयार करण्यात आले आहे. इनडोअर गेम्सच्या सुविधेसोबतच मुलांच्या मनोरंजनाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
याशिवाय याठिकाणी कोणत्याही प्रकारची अश्लीलता पसरवणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी येथे दोन तात्पुरत्या पोलिस चौक्या उभारल्या असून सुरक्षेसाठी 22 पोलिसही तैनात केले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवास होऊ शकतो.
टेंट सिटीमध्ये राहण्यासाठी पर्यटक ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने बुकिंग करू शकतात. यासाठी tentcityvaranasi.com या वेबसाइटवर जाऊन बुकिंग करता येईल. टेंट सिटीच्या ऑनलाइन बुकिंगबरोबरच ऑफलाइनही ठेवण्यात आली आहे. 15 जानेवारीपासून बुकिंग करता येईल.
टेंट सिटीमध्ये राहण्याचे भाडे आठ हजार ते तीस हजार रुपये प्रतिदिन ठेवण्यात आले आहे. यासोबतच विशेष कार्यक्रमांच्या भाड्यातही वाढ होणार आहे.