मुंबई : ब्रह्म मुहूर्ताला हिंदू धर्मग्रंथांमध्ये अत्यंत शुभ मानले गेले आहे. झोपेतून जागे होण्यासाठी हा काळ खूप चांगला आहे. असे मानले जाते की ब्रह्म मुहूर्तावर उठल्याने व्यक्तीला शक्ती, ज्ञान, सौंदर्य आणि बुद्धी प्राप्त होते. ब्रह्म मुहूर्तामध्ये (Brahama Muhurta) आपली दिनचर्या सुरू केल्यास सकारात्मक ऊर्जा विकसित होते, असे म्हटले जाते. एवढेच नाही तर यावेळी केलेले कोणतेही काम यशस्वी होते. अनेक सशस्वी लोकांनी ब्रह्म मुहूर्ताचे फायदे सांगीतले आहे, तसेच त्यांच्या यशात ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे विशेष योगदान असल्याचेही ते सांगतात.
रात्रीच्या शेवटच्या घटकेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. ब्रम्ह मुहूर्ताचा काळ मानवासाठी जागृत होण्याचा सर्वोत्तम मानला जातो. या कालावधीत जागे झाल्याने शरीर सुदृढ राहते, आजार दूर राहतात आणि आरोग्य चांगले राहते असे मानले जाते. तसेच ब्रह्म मुहूर्तावर उठून देवाची पूजा केल्याने देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपाही प्राप्त होते अशी देखील मान्यता आहे. या वेळेत अनेक जण गाढ झोपेत असतात. जे त्यांच्या आरोग्य, बुद्धिमत्ता इत्यादीच्या दृष्टिकोनातून योग्य मानले जात नाही.
रात्रीच्या शेवटच्या प्रहरानंतरच्या आणि सूर्योदयापूर्वीच्या वेळेला ब्रह्म मुहूर्त असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. पहाटे 4 ते 5:30 या वेळेला ब्रह्म मुहूर्त म्हणतात. यावेळी केलेल्या देवपूजेचे लवकर फळ मिळते असे सांगितले जाते. त्यामुळे या मुहूर्तावर मंदिरांचे दरवाजेही उघडले जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वीचा काळ अतिशय शुभ मानला जातो. असे म्हणतात की यावेळी वातावरण अतिशय शुद्ध आणि सकारात्मकतेने भरलेले असते. सकाळी फेरफटका मारल्याने शरीरात संजीवनी शक्तीचा संचार होतो. ब्रह्म मुहूर्ताचा वारा अमृतसारखा आहे. या वेळी उठून देवाची पूजा केल्याने मनुष्याला शुभ फल प्राप्त होतात. प्राचीन काळापासून ऋषीमुनी या काळात उठून स्नान वगैरे आटोपून देवपूजेत मग्न होत असत. हा काळ देवांचा काळ मानला जातो. या काळात देव आणि पितरांचे आगमन होते अशी धार्मिक श्रद्धा आहे.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)