मुंबई, बुधवार (Budhwar Upay) म्हणजे गणेशाचा दिवस मानला जातो. हिंदू धर्माची एक विशेष श्रद्धा आहे की, जर तुम्हाला कोणत्याही कामात काही अडथळे येत असतील, तर विघ्नहर्त्याची विधीवत पूजा करा आणि त्याच्या आवडत्या गोष्टी लाडू आणि दूर्वा अर्पण करा. गणपतीला लाडू आवडतात हे सर्वांनाच माहित आहे, पण गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात आणि त्यामागील पौराणिक कथा काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा राक्षस होता, त्याच्या भीतीमुळे स्वर्ग आणि पृथ्वीवर गोंधळ माजला होता. अनलासुर हा असा राक्षस होता, जो ऋषीमुनींना आणि मानवांना जिवंत गिळत असे. या राक्षसाच्या अत्याचाराने व्यथित होऊन सर्व देव-देवता, ऋषी-मुनी भगवान शंकराची प्रार्थना करण्यासाठी आले आणि सर्वांनी अनलासुराच्या दहशतीमुळे झालेला कहर नाहीसा करण्यासाठी भगवान शंकराची प्रार्थना केली.
मग महादेवाने सर्व देवता आणि ऋषींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की अनलासुर राक्षसाचा नाश फक्त गणेशच करू शकतो. भगवान शंकराचे म्हणणे ऐकून सर्व देवी-देवतांनी आणि ऋषीमुनींनी गणेशाची प्रार्थना केली, भगवान गणेशाने संपूर्ण जगाचे रक्षण करण्यासाठी अनलासुर राक्षसाला गिळले. यामुळे गणेशाच्या पोटात जळजळ होऊ लागली. तेव्हा 88 सहस्त्र मुनींनी प्रत्येकी 21 अशा हिरव्यागार दुर्वांच्या जुड्या गणरायाच्या मस्तकावर ठेवल्या. आणि कश्यप ऋषींनी दुर्वांच्या 21 जुडी गणेशाला खाण्यास दिली. त्यावेली अथक प्रयत्नानंतरही गणेशाच्या पोटातली न थांबलेली जळजळ कमी झाली.त्यावेळी, यापुढे मला दुर्वा अर्पण करणाऱ्यास हजारो यज्ञ, व्रते, दान व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळेल, असे गणराय म्हणाला होता. म्हणून गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)