मुंबई : हिंदु पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर नववर्ष सुरु होते. या दिवासापासून देवी दुर्गेच्या नऊ विविध रुपांची पूजा केली जाते. गुढीपाडव्यापासून चैत्र नवमीपर्यंत नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदा चैत्र नवरात्री 22 मार्च ते 30 मार्चपर्यंत असणार आहे. या काळात दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे यंदाचं नवरात्रोत्सव खास असणार आहे. या योग काळात देवी दुर्गेची पूजा केल्यास आशीर्वाद मिळेल, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री या देवींची पूजा केली जाते.
हिंदू पंचांगानुसार चैत्र महिना शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून आरंभ होतो. या वर्षी चैत्र नवरात्रीला शुक्ल आणि ब्रह्म योग जुळून येणार आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच प्रतिपदा तिथीवर ब्रह्म योग सकाळी 9 वाजून 18 मिनिटांपासून 23 मार्चपर्यंत असणार आहे. दुसरा शुभ शुक्ल योग 21 मार्चला दुपारी 12 वाजून 42 मिनिटांनी सुरु होईल. हा योग 22 मार्चपर्यंत राहील. ब्रह्म योगानंतर इंद्र योगाचं निर्माण होणार आहे.
चैत्र नवरात्री 22 मार्चपासून सुरु होणार आहे.चैत्र प्रतिपदा तिथी 21 मार्चला रात्री 10 वाजून 52 मिनिटांनी सुरु होईल. तसेच 22 मार्चला 8 वाजून 20 मिनिटांनी संपेल. पण उदय तिथीनुसार चैत्र नवरात्री 22 मार्चपासून असेल. या दिवशी घटस्थापना मुहूर्त सकाळी 6 वाजून 23 मिनिटांनी सुरु होईल आणि सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी संपेल. म्हणजेच घटस्थापनेसाठी 1 तास 9 मिनिटांचा अवधी मिळेल.
सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा. कलश स्थापना करण्यापूर्वी एका लाल कपड्यावर देवीची प्रतिमा स्थापित करा. त्यानंतर एका भांड्यात लाल माती टाकून गहू टाका. त्या भांड्यामध्ये कळश ठेवण्याची जागा ठेवाल.कलश मधोमध ठेवून मोलीने बांधाल आणि त्यावर स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढा.
कलाशाला कुंकू लावून टिळा लावा. कळश गंगाजलाने पूर्ण भरा. त्यानंतर कळशात सुपारी, फुलं, अत्तर, पाच रत्न, नाणी आणि पाच प्रकारची पानं ठेवा. पानं कळशाबाहेर राहतील याची काळजी घ्या. त्यावर थाळी ठेवून पूर्णपणे तांदळाने भरा.
लाल कपड्यात नारळ गुंडाळून रक्षासूत्राने बांधा. हा नारळ आपल्याकडे तोंड करून तांदळाने भरलेल्या थाळीवर ठेवा. देवीदेवतांना आव्हान करून कळश पूजा करा. कळशाला टिका लावा, अक्षता वाहा, फुलं वाहा, अत्तर आणि नैवेद्य आणि फळ-मिठाई अर्पण करा.तसेच गहू पेरलेल्या ठिकाणी नियमित पाणी टाका. एक दोन दिवसानंतर अंकुर फुटताना तुम्हाला दिसतील.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)