मुंबई, आचार्य चाणक्य (Aacharya Chanakya) यांना भारताचे महान विद्वान आणि अर्थशास्त्रज्ञ म्हटले जाते. चाणक्याने आपल्या निती (Chanakya Neeti) शास्त्रात जीवनातील समस्यांचे समाधान सांगितले आहे. चाणक्याचे नीती शास्त्र केवळ व्यक्तीला मार्गदर्शन करत नाही तर उंचीवर पोहोचण्याचे निश्चित मार्ग देखील सांगते. जगातील सर्वात सामर्थ्यवान गोष्टीचाही त्यांनी आपल्या नीतिशास्त्रात उल्लेख केला आहे. चाणक्य सांगतात की, काळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट आहे. माणसाला वेळेचे महत्त्व समजले की त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा लोकांकडे प्रत्येक अडचणीवर उपाय असतो.
घर किंवा शाळेत वेळेचा योग्य वापर करण्याचे महत्त्व आपल्याला लहानपणापासूनच शिकवले जाते. आचार्य चाणक्याने आपल्या नीती शास्त्रातही याचा उल्लेख केला आहे. आचार्य चाणाक्य हे वेळ ही जगातील सर्वात शक्तिशाली गोष्ट मानतो. वेळ सर्वांसाठी सारखीच असते. ती कधीही श्रीमंत-गरीब किंवा उच्च-नीच पाहत नाही. वेळ कोणासाठीही थांबत नाही आणि परतही येत नाही. म्हणूनच ज्याला वेळेची किंमत समजली त्याचा आयुष्यात कधीच पराभव होत नाही.
आचार्य चाणक्य म्हणतात की, माणसाचे नशीब बदलायला वेळ लागत नाही. ध्येय गाठण्यासाठी जे योग्य वेळी निर्णय घेतात, त्यांना यश नक्कीच मिळते. त्यांना भविष्यात फार कमी समस्यांना सामोरे जावे लागेल. आणि हे सर्व वेळेचे महत्त्व समजून त्याचा सदुपयोग केल्यामुळे शक्य होते.
चाणक्यच्या मते, धनाची देवी माता लक्ष्मी ही ज्यांना वेळेची किंमत समजते त्यांच्यावर नेहमी प्रसन्न असते. असे लोकं योग्य वेळी योग्य काम करतात, त्यामुळे त्यांचा मार्ग खूप सोपा होतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी जीवनात, विद्यार्थ्यांनी पूर्ण एकाग्रतेने अभ्यास केला पाहिजे आणि तारुण्यात त्यांच्या कृतींबद्दल सतर्क आणि प्रामाणिक असले पाहिजे. जे लोकं या नियमाचे पालन करतात, त्यांच्यावर लक्ष्मीची कृपा सदैव राहते.
याउलट, जे आजचे काम उद्यासाठी सोडून देतात किंवा वेळेवर आपली कामे पूर्ण करत नाहीत, ते धनदेवतेच्या आशीर्वादापासून नेहमीच वंचित राहतात. अशा लोकांच्या जीवनात धन आणि सुखाची कमतरता नेहमीच असते.
आचार्य चाणक्य सांगतात की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा काळ चांगला असतो तेव्हा त्याच्यामध्ये अभिमान आणि अहंकार वाढू लागतो. अशा लोकांमध्ये मानवी गुणांची कमतरता असते. हे लोकं चांगलं आणि वाईट भेद करायला विसरतात. पण एक ना एक दिवस त्यांना त्यांच्या कृत्याबद्दल नक्कीच पश्चाताप होतो. त्यांचा अभिमान आणि उद्धटपणा पाहून मित्र आणि नातेवाईक अंतर ठेवतात. आणि जेव्हा अशा माणसाचा वाईट काळ सुरू होतो तेव्हा त्यांच्या मदतीसाठी कोणीही पुढे येत नाही.