मुंबई : आज चंद्रग्रहण आहे. काही कारणांमुळे उद्याचं ग्रहण हे विशेष ठरणार आहे. ग्रहण म्हंटलं की दोन प्रकारच्या चर्चा या कायम होतात. त्या म्हणजे शास्त्रीय आणि आध्यात्मिक. दोनीही बाबतीत ग्रहण हे विशेष आणि महत्त्वाचं मानल्या जातं. असं असलं तरी एक गोष्ट तुमच्या कधी लक्षात आली आहे का? की चंद्रग्रहण (Lunar Eclipse) हे नेहमी पौर्णिमेलाच लागतं. अमावस्येला ग्रहण लागल्याचं तुम्ही कधी एकलं नसेल. पण हे असं का होतं? ग्रहणाचा आणि पौर्णिमेचा नेमका संबंध तरी काय आहे? हा योगायोग कसा जुळून येतो? हे कुतूहल तुम्हालासुद्धा आहे का? जर असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठीच आहे. खगोलशास्त्राचे अभ्यासक मिलींद गोडबोले यांच्याकडून आज आपण ग्रहणाबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो हे आपण लहानपणीच भूगोलाच्या पुस्तकात शिकलो आहे. या प्रक्रियेत एक वेळ अशी येते जेव्हा चंद्र, पृथ्वी आणि सूर्य एकाच रेषेत येतात आणि सूर्यप्रकाश पृथ्वीवर पडतो पण चंद्रापर्यंत पोहोचत नाही. या घटनेला खगोलीय घटना म्हणून चंद्रग्रहण म्हणतात. ग्रहण म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर फक्त पृथ्वीची चंद्रावर पडणारी सावली आहे.
हा प्रश्न आपल्यापैकी अनेकांसाठी कुतूहलाचा असू शकतो तो म्हणजे चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमा तिथीलाच का होते? त्यामागचं कारणही आपण जाणून घेऊया. पौर्णिमा तिथी प्रत्येक महिन्यात येते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला ग्रहण होणे शक्य नाही. खरे तर चंद्र पृथ्वीच्या कक्षेत सुमारे 5 अंशाने झुकलेला राहतो. या कलतेमुळे चंद्र प्रत्येक वेळी पृथ्वीच्या सावलीतून जात नाही. यामुळे बहुतेक वेळा चंद्र पृथ्वीच्या वर किंवा खाली जातो. या कारणास्तव, प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होत नाही, परंतु जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जातो तेव्हा त्या दिवशी पौर्णिमा येते आणि सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात. या कारणास्तव, चंद्रग्रहण केवळ पौर्णिमेच्या दिवशीच शक्य आहे. हा एक अत्यंत दुर्मिळ योगायोग असतो त्यामुळे चंद्र ग्रहणाला शास्त्रीय दृष्ट्या विशेष महत्त्व आहे.
चंद्रग्रहण हे पौर्णिमेलाच का लागतं याबद्दल तर आपण जाणून घेतलं पण विषय निघालाचं आहे तर हेही जाणून घेऊया की सूर्यग्रहण फक्त अमावस्या तिथीलाच का लागतं? यामागचं कारण म्हणजे चंद्र पृथ्वीभोवती फिरतो आणि एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी त्याला 27 दिवस लागतात. जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो तेव्हा या घटनेला सुर्यग्रहण म्हणतात. अमावस्या तिथीला चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो, म्हणून सूर्यग्रहण नेहमी अमावस्या तिथीलाच होते.