मुंबई : प्रत्येक शुक्ल आणि कृष्ण पक्षातील पंधरवड्यात एकादशी असते. ही एकादशी भगवान विष्णुंना समर्पित असते. त्यात देवशयनी एकादशीचं महत्त्व अधिक आहे. या दिवशी भगवान विष्णुंची उपासना केल्याने अक्षय पुण्याची प्राप्ती होते अशी मान्यता आहे. या दिवसापासूनच चातुर्मासाला सुरुवात होते. या एकादशीपासून भगवान विष्णु चार महिन्यांसाठी निद्रावस्थेत जातात. या काळात सृष्टीचा भार भगवान शिवांच्या हाती असतो. 29 जून 2023 पासून चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. तर कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला देवउठनी एकादशी असणार आहे. म्हणजेच 23 नोव्हेंबर 2023 रोजी ही तिथी असणार आहे. म्हणजेच पाच महिन्यांचा काळावधी असणार आहे.
यंदा अधिक श्रावस मास आहे. यामुळे श्रावण यंदा दोन महिन्यांचा असणार आहे. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला संपतं. पण अधिक मासामुळे पाच महिन्यांचा चातुर्मास असणार आहे. या काळात भगवान विष्णुंसह देवी देवता योग निद्रेत जात असल्याने मंगलकार्य केली जात नाहीत.
आषाढी एकादशी 29 जून 2023 रोजी सकाळी 3 वाजून 18 मिनिटांनी सुरु होईल. तसेच ही तिथी 30 जून रोजी सकाळी 2 वाजून 42 मिनिटांनी संपेल. या दिवशी रवि योग असणार असून सकाळी 5:26 मिनिटे ते 4:30 मिनिटांपर्यंत असेल. शास्त्रानुसार, या दिवशी भगवान विष्णुंची उपासना केल्याने अक्षय पुण्य मिळतं. तसेच स्नान आणि दानाचं महत्त्व अधोरेखित होतं.
चातुर्मासात मुंडन, उपनयन संस्कार, विवाह, गृह प्रवेश, भूमि पूजन इत्यादी शुभ कार्य करत नाहीत. कारण या काळात भगवान विष्णु क्षीरसागरात निद्रा अवस्थेत असतात. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळत नाही. तसेच शुभ कार्यात विघ्न पडण्याची शक्यता असते. त्यामुळे शुभ कार्य करायचं असेल तर पाच महिने थांबाव लागणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार या काळात दान केल्याने पापातून मुक्ती मिळते. सुख समृद्धीसाठी भगवान विष्णुंची उपासना करावी. गरीब आणि गरजू लोकांना पिवळ्या वस्तूंचं दान करावं. यात चणे, गुळ, कपडे दान करावे. तसेच गरीबांना भोजन दिल्यास शुभ फळ मिळतं.
नोकरी आणि व्यवसायत अडचण असेल चातुर्मासात छत्री, कपडे, अन्न आणि कापुराचं दान करावं. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात. तसेच आपल्या इच्छा पूर्ण करतात अशी मान्यता आहे. चातु्र्मासात नियमितपणे विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचं पठण करा.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)