वर्धा : जिल्ह्यात पावसाने शनिवारी चांगलाच कहर केलाय. मुसळधार आलेल्या पावसामुळे नदी नाल्याना पूर आलाय. धरणातूनही पाण्याचा विसर्ग (discharge from the dam) सुरू करण्यात आलाय. आर्वी तालुक्यातील बाकळी नदीला (Bakli river) पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे आर्वी कौढण्यपूर राज्यमार्ग बंद झाला. यावरील वाहतूक ठप्प झाली आहे. विदर्भाची पंढरी म्हणून अमरावती जिल्ह्याच्या कौढण्यपूर याला ओळखल्या जाते. आषाढी एकादशी निमित्त मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी (Darshan) येतात. बाकळी नदीला आलेल्या पुरामुळे वर्धा जिल्ह्यातून जाणारे भाविक येथे अडकले आहेत. कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये म्हणून या पुलावर पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आला आहे. विठ्ठलची पूजा करण्याकरिता जाणारे भाविक पुलावर पाणी असल्याने अडकून पडले आहेत. काही भाविक नदीच्या पलीकडूनच भजन कीर्तन करून विठ्ठलला साकडे घालत आहेत. सकाळपासून या पुलावरून पाणी असल्याने अनेक भाविक पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत. शनिवारी आलेल्या पावसाने जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
यवतमाळ जिल्ह्यात दुपारी दोन वाजतापासून पावसाने चांगलाच जोर धरला. सद्या या भागात पावसाची रिमझिम कायम असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वणी तालुक्यातील निर्गुडा नदीला पूर आला. काही काळ भालर गावचा संपर्क तुटला होता. झरी तालुक्यातील लिंगती येथील पूलदेखील पाण्याखाली गेल्याचे पाहायला मिळत आहे. सद्या लिंगती मुकुटंबन परिसराचा संपर्क तुटला आहे. पाणी कमीदेखील झाले. जो पर्यायी मार्ग बनवण्यात आला होता तो पूर्ण वाहून गेला आहे.
सद्या झरी व मुकुटंबन परिसरात पावसाचा रिपरिप सुरू आहे. वणी तालुक्याला देखील प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जामनी परिसरातील पेटूर नदीलाही पूर आल्याने आजूबाजूच्या दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला होता. या दोन तालुक्यातील हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली आले. नुकसान ग्रस्त भागाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले आहे. पुढील दोन ते तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा या भागात देण्यात आला आहे.