मुंबई : यावेळी 14 नोव्हेंबरला म्हणजेच आज गोवर्धन उत्सव साजरा होत आहे. याशीवाय आज दिवाळी पाडवा देखील आहे. पाडव्याच्या दिवशी पत्नी आपल्या पतिचे औक्षवण करते. पाडवा आणि गोवर्धन पूजा (Govardhan Puja) हा सण भाऊबीजेच्या (bhai dooj) एक दिवस आधी साजरा होतो. गोवर्धन पूजेमध्ये गौ धन म्हणजेच गायीची पूजा केली जाते आणि गायीला लक्ष्मीचे रूप देखील म्हटले जाते. याला अन्नकूट असेही म्हणतात. या दिवशी प्रामुख्याने भगवान श्रीकृष्ण आणि गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते. पौराणिक कथेनुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून भगवान इंद्राच्या कोपापासून ब्रज लोकांचे रक्षण केले. भगवान इंद्रालाही आपली चूक कळून आली. तेव्हापासून, भगवान श्रीकृष्णाचे उपासक त्यांना गहू, तांदूळ, बेसनापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्या दाखवतात.
हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला गोवर्धन पूजा साजरी केली जाते. गोवर्धन पूजेची तारीख 13 नोव्हेंबर रोजी म्हणजेच काल दुपारी 2:56 वाजता सुरू झाली आहे आणि 14 नोव्हेंबर रोजी म्हणजेच आज दुपारी 2:36 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार आज 14 नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा साजरी केली जात आहे. गोवर्धन पूजेसाठी आजचे दोन शुभ मुहूर्त असतील. एक मुहूर्त आज सकाळी 6:43 ते 8:43 पर्यंत आणि दुसरा मुहूर्त आज संध्याकाळी 5:28 ते 5:55 पर्यंत असेल.
या दिवशी सर्व प्रथम शरीराला तेलाने मसाज करून स्नान करावे. यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शेण टाकून गोवर्धन पर्वताचा आकार तयार करा. तसेच त्या पर्वताला वेढून त्याभोवती गुराख्यांचे, झाडांचे आणि वनस्पतींचे आकार बनवा. त्यानंतर गोवर्धन पर्वताच्या मध्यभागी श्रीकृष्णाची मूर्ती किंवा चित्र ठेवा. यानंतर गोवर्धन पर्वत आणि श्रीकृष्णाची पूजा करा. पूजा केल्यानंतर, आपल्या इच्छांसाठी प्रार्थना करा. यानंतर भगवान श्रीकृष्णाला पंचामृत आणि मिष्ठान्नाचा नैवेद्य दाखवाव.
या दिवशी भक्त श्रीकृष्णाला विविध प्रकारचे मिष्ठान्न आणि पदार्थांचा नैवेद्य दाखवतात. एवढेच नाही तर या दिवशी 56 प्रकारचे पदार्थ तयार करून भगवान श्रीकृष्णाला अर्पण केले जाते आणि या 56 प्रकारच्या पदार्थांना अन्नकूट म्हणतात. या दिवशी मंदिरांमध्येही अन्नकूट आयोजित केले जाते.
गोवर्धन पूजा करण्यामागील धार्मिक धारणा अशी आहे की भगवान श्रीकृष्णांना इंद्राचा अहंकार मोडायचा होता. यासाठी त्यांनी आपल्या करंगळीवर गोवर्धन पर्वत उचलून गोकुळातील लोकांचे इंद्रापासून रक्षण केले. त्यानंतर कार्तिक शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी 56 नैवेद्य करून गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा आदेश स्वतः भगवान श्रीकृष्णाने दिला होता, असे मानले जाते. तेव्हापासून आजही गोवर्धन पूजेची परंपरा सुरू असून दरवर्षी गोवर्धन पूजा आणि अन्नकूट हा उत्सव साजरा केला जातो.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)