मुंबई : काही लोकांना दररोज मंदिरात जाऊन शिवलिंगाला (Shivlinga Puja Rules) जल अर्पण करता येत नाही, म्हणून ते घरी शिवलिंग स्थापित करून त्याची पूजा करतात. घरातील शिवलिंगाची पूजा करण्याबाबत शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया कोणते आहेत हे नियम जेणे करून तुम्हालाही शिवाच्या कृपेचा लाभ घेता येईल. हिंदू घरातील काही लोकं रोज आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करतात आणि त्याला जल अर्पण करतात. पण तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही घरात शिवलिंग स्थापित केले असेल तर त्याची पूजा करण्याचे काही खास नियम आहेत. भगवान शंकराच्या पूजेमध्ये या नियमांचे पालन करणे अनिवार्य मानले जाते. शुद्धतेने महादेवाला एक तांब्या पाणी आणि बेलपत्र अर्पण केल्यास ते लवकरच आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. घरी शिवलिंगाची पूजा करण्याचे हे नियम अवश्य पाळावे.
जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापित केले असेल तर त्याची रोज नियमित पूजा करा. वेळेअभावी किंवा इतर कारणामुळे शिवलिंगाचा जलाभिषेक करता येत नसेल तर घरी शिवलिंगाची स्थापना करू नका. जर तुम्ही नियमितपणे शिवलिंगाची पूजा केली नाही तर तुम्हाला भगवान शंकराच्या प्रकोपाचा सामना करावा लागू शकतो आणि तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात.
घरामध्ये स्थापित करावयाच्या शिवलिंगाची लांबी तुमच्या अंगठ्यापेक्षा जास्त नसावी, कारण शिवपुराणात सांगितले आहे की जर तुम्ही तुमच्या अंगठ्यापेक्षा मोठे शिवलिंग घरात ठेवले तर तुम्हाला अशुभ परिणाम प्राप्त होतील.
जर घरात शिवलिंग असेल तर लक्षात ठेवा की जल नेहमी उत्तरेकडे तोंड करून अर्पण करावे. चुकूनही दक्षिण किंवा पूर्वेकडे तोंड करून अभिषेक करू नका. उत्तरेकडे तोंड करून जल अर्पण केल्याने तुम्हाला भगवान शिव आणि देवी पार्वती या दोघांचा विशेष आशीर्वाद मिळतो.
शिवाला कधीही स्टीलच्या भांड्यात जल अर्पण करू नका. असे करणे शुभ मानले जात नाही. भगवान शंकराला नेहमी तांब्याच्या भांड्यातच जल अर्पण करा. पितळी भांडीही वापरता येतील. पण चुकूनही लोखंडी भांडे वापरू नका.
लक्षात ठेवा चुकूनही भगवान शंकराच्या क्रोधी मुद्राचे चित्र घरात लावू नका. असे चित्र लावल्याने घरातील सदस्यांमध्ये संताप वाढतो आणि प्रत्येक विषयावर भांडणे होतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)