हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे. आयुर्वेदातही तुळशी महिमा वर्णिला गेला आहे. तुळशीमुळे घरात सुख समृद्धीचा वास होतो अशी मान्यता आहे. तुळशीचे दोन प्रकार आहेत. रामा तुळस आणि कृष्ण तुळस.. दोन्ही नावं ही भगवान विष्णुंच्या रुपांची आहेत. त्यामुळे तूळस आणि भगवान विष्णुंचं नातं अधोरेखित करते. जिथे भगवान विष्णु तिथे माता लक्ष्मी.. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा व्हावी यासाठी तुळशीची पूजा करण्याची मान्यता आहे. सत्यनारायणाच्या पूजेतही तुळशीपत्र वाहिली जातात. यावरूनच कळतं की तुळस ही भगवान विष्णुंना किती प्रिय आहे. भगवान विष्णुंना कोणताही नैवेद्य हा तुळशी पत्राशिवाय अर्धवट मानला जातो. यावरून तुळशीचं महत्त्व अधोरेखित होतं. त्यामुळे सकाळ संध्याकाळ पूजा करताना तुळशी वृंदावनापाशी दिवा लावला जातो. दिवा लाविला तुळशीपाशी..आणि उजेड पडला विष्णुपाशी..अशी प्रार्थनाही म्हंटली जाते. पण या तुळशीची पुजा करताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. अन्यथा अपेक्षित फळ मिळत नाहीत. याबाबत धर्मशास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन करणं गरजेचं आहे.
तुळशीला कायम सूर्योदय म्हणजेच सकाळी जल अर्पण करावं. यावेळेस जल अर्पण केल्यास इच्छित फळप्राप्ती होते. तसेच आर्थिक प्रश्नही दूर होतात. पण तुळशीला जल अर्पण करताना दोन दिवस कायम लक्षात ठेवायचे. एक रविवार आणि दुसरा एकादशी. या दिवशी तुळशीला जल अर्पण करू नये. कारण एकादशीला तुळशीचा निर्जला उपवास असतो. जल अर्पण केल्यास व्रत भंग होतो अशी मान्यता आहे. दुसरीकडे, तुळशीला अधिक प्रमाणात जल अर्पण करू नये. यामुळे तुळशीचं मूळ खराब होतात आणि रोप सुकतं. तुळशीचं रोप सुकणं चांगलं मानलं जात नाही.
तुळशीचं रोप लावताना कायम कोणत्या दिशेस असावं याचं भान ठेवणं गरजेचं आहे. दक्षिण दिशेस चुकूनही रोप लावू नये. नाही तर नकारात्मक उर्जेचा संचार होतो. दुसरं, महिलांनी तुळशीची पूजा करताना कायम केस बांधून पूजा करावी असं धर्मशास्त्र सांगतं. यामुळे तुळशीमातेची कृपा राहते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)