मुंबई : दसरा (Dussehera 2023) म्हणजेच विजयादशमी देशभरात मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात साजरी केली जाते. या दिवशी लोकं रामाची पूजा करतात. या वर्षी दसरा मंगळवार, 24 ऑक्टोबर 2023 रोजी उद्या साजरा केला जाईल. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि रावणावर रामाच्या विजयाचे प्रतीक आहे. दसऱ्याच्या दिवशी देशातील बहुतांश भागात रावणाचे दहन केले जाते, तर काही ठिकाणी रावणाचे दहन केले जात नाही आणि रावणाची पूजा केली जाते. यामागे अनेक समजुती आहेत. अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे विजयादशमीच्या दिवशी रावणाचे दहन केले जात नाही.
मान्यतेनुसार रावणाची पत्नी मंदोदरी हिचा जन्म मध्य प्रदेशातील मंदसौर येथे झाला होता. अशा परिस्थितीत येथील लोक रावणाला मंदसौरचा जावई मानतात. यामुळेच दसऱ्याच्या दिवशी येथील स्थानिक लोकं रावणाच्या मृत्यूचा शोकं करतात. या भागात रावणाची अनेक मंदिरेही बांधली गेली आहेत जिथे रावणाची पूजा केली जाते.
अनेक मान्यतेनुसार, उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडामधील बिसरख गाव हे रावणाचे जन्मस्थान मानले जाते. रावणाचे वडील विश्रवा यांच्या नावावरून या गावाचे नाव पडले असा अनेकांचा समज आहे. येथे रावणाला महाब्राह्मण मानले जाते. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी येथे रावणाचे दहन केले जात नाही, तर रावणाच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी येथील लोकं या दिवशी यज्ञ करतात.
अनेक मान्यतेनुसार, रावणाचा विवाह राजस्थानमधील जोधपूर येथे मंदावरची कन्या मंदोदरी हिच्याशी झाला होता. जोधपूर हे रावण आणि मंदोदरीचे लग्नस्थान मानले जाते. आजही येथे रावणाची चावरी नावाची छत्री आहे. त्यामुळे जोधपूरच्या काही भागात केवळ दसऱ्यालाच नव्हे तर दररोज रावणाची पूजा केली जाते. येथे दसऱ्याला कधीही पुतळे जाळले जात नाहीत. एवढेच नाही तर येथील काही लोकं स्वतःला रावणाचे वंशज मानतात.
मान्यतेनुसार, कांगडा जिल्ह्यात शिवनगरी म्हणून प्रसिद्ध असलेले बैजनाथ शहर आहे जिथे रावणाने आपल्या भक्ती आणि तपश्चर्येने भगवान शिवाला प्रसन्न केले होते, त्यानंतर भगवान शिवाने रावणावर अपार आशीर्वाद दिला. रावणाचे दहन केल्यास त्यांचा मृत्यू होऊ शकतो, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. यामुळेच कांगडा येथील लोक दसऱ्याला रावणाचा पुतळा जाळत नाहीत.
भगवान शंकराच्या भक्तीमुळे कर्नाटकातील कोलार जिल्ह्यात रावणाची पूजा केली जाते. येथे दसऱ्याच्या दिवशी रावणाचे दहन केले जात नाही. येथील स्थानिक लोकं भगवान शंकराची त्यांच्या दहा मुखी आणि वीस हातांच्या मूर्तीसह पूजा करतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)