चंद्रपूर : यावर्षी चंद्रपूर जिल्ह्याला सतत चारदा पुराचा तडाखा बसला. त्यामुळं मूर्तींसाठी (Sculptors) लागणारी माती वाहून गेली. गणेश मूर्तींसाठी लागणाऱ्या मातीचा तुटवडा (shortage of clay) निर्माण झाला. परिणामी मूर्तींच्या किमती 30 ते 40 टक्क्याने महागड्या झाल्यात. याशिवाय पेट्रोल-डिझेलचे वाढलेले दर, मजुरीत झालेली वाढ, सजावटीच्या साहित्याच्या वधारलेल्या किमती याचा एकत्रित परिणाम मूर्तींच्या किंमतींवर झाला आहे. यावर्षी निर्बंधमुक्त उत्सव साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. मूर्तींची विक्री होणार की नाही, याची चिंता मूर्तिकारांना सतावत आहे. परिणामी आगाऊ मूर्ती तयार न करता मागणीप्रमाणे मूर्ती तयार केल्या जात आहेत. मातीच्या मूर्ती तयार करणारे कारखानेही (factories) यावेळी कमी आहेत. त्यात पीओपी मूर्ती चोरून-लपून विकल्या जात असल्याने मातीच्या मूर्तीकारांचे मोठे नुकसान होते. समाधानाची बाब एवढीच आहे की, सध्या पावसाने विश्रांती घेतली. ऊनही चांगले पडू लागले. त्यामुळे मूर्ती सुकविण्यासाठी लागणारी धडपड यावेळी वाचली आहे.
गणरायाच्या आगमनाला एक दिवस शिल्लक आहे. त्यामुळं नागपूरच्या बाजारपेठांमध्ये लगबग वाढलीय. बाजारपेठा आकर्षक गणेश मूर्ती आणि साहित्यांनी सजल्या आहेत. नागपूरची चितारओळी ही मूर्तिकारांची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाते. या चितारओळीत सध्या आकर्षक गणेश मूर्ती लक्ष वेधून घेत आहेत. उद्या होणारी गर्दी टाळण्यासाठी भाविकही आजच आपल्या लाडक्या बाप्पाला घेऊन जात आहेत.
महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आगमन 31 ऑगस्ट रोजी वाजत गाजत करण्यात येणार आहे. त्यामुळे गोंदियाकर आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी सज्ज झाला आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यात 726 ठिकाणी सार्वजनिक गणपतीची तर 5 हजार 264 घरांत घरगुती गणपतीची स्थापना होणार आहे. तर 404 गावांत ‘एक गाव-एक गणपती’ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. गणेशोत्सवात दरवर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. या कार्यक्रमांना मोठ्या प्रमाणात गर्दी राहायची. मात्र दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात गर्दी झाली नव्हती. मात्र आता गर्दी दिसणार आहे. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यात यावा, यासाठी गोंदिया पोलिसांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. त्यांना नियमावली समजावून सांगत उत्सव शांततेत पार पाढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.