मुंबई : फाल्गुन महिन्याच्या (Falgun Month) पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन होते. दुसऱ्या दिवशी होळीचा (Holi) सण साजरा केला जातो. यावेळी होलिका दहन 17 मार्च आणि होळी 18 मार्च, शुक्रवारी साजरी केली जाईल. होळीच्या 8 दिवस आधी म्हणजेच 10 मार्चपासून होलाष्टक होणार आहे. या काळात कोणतेही शुभ कार्य करण्यास मनाई असते. होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ (Holi Astak)हा शब्द तयार झाला आहे. म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. होळी म्हणजे रंगांचा सण, महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते. होळी या सणाला महाराष्ट्रात शिमगा या नावाने ओळखतात. तर उत्तर भारतात याला दोला यात्रा किंवा होरी असे म्हटले जाते. दक्षिण भारतात हा उत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करतात.
होलिका दहनाचा शुभ मुहूर्त (होळी 2022 तारीख आणि शुभ मुहूर्त)
होलिका दहन तारीख – 17 मार्च (सोमवार)
होलिका दहन शुभ मुहूर्त – रात्री 9.20 ते रात्री 10.31 पर्यंत. म्हणजेच होलिका दहनासाठी सुमारे 1 तास 10 मिनिटे उपलब्ध असतील.
होलिका दहनाच्या ठिकाणी काही दिवस आधी सुकलेले झाड ठेवले जाते. होलिका दहनाच्या दिवशी त्यावर लाकूड, गवत, पेंढा आणि शेणखत ठेवून पेटवतात. होलिका दहनाच्या शुभ मुहूर्तावर कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीने अग्नी प्रज्वलित करावा. होलिका दहनाला अनेक ठिकाणी छोटी होळी असेही म्हणतात.
असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची अशी प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादाघेऊन जळत्या अग्नीत बसली होती.
होळीकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ आहे.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)