मनोज गाडेकर,
शिर्डी : यु ट्यूब आणि इंन्टाग्रामवर रील बनवून शेअर करण्याचा ट्रेंड दिवसंदिवस वाढतचं आहे. रील बनवण्याचा असाच एक प्रकार एका तरूणाच्या अंगलट आला. शिर्डीच्या साई मंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यावर बंदी आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हे नियम बनवण्यात आले. शिर्डीच्या साई बाबा मंदिर परिसरात ड्रोन द्वारे शूट करून (Drone Video Shirdi Sai Mandir) त्याचा व्हिडीओ रील इंन्टाग्रामवर पोस्ट केला. ही रील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. मुंबई येथील तरूणाने रील बनवण्यासाठी ड्रोन उडवल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर झाल्यावर हा सगळा प्रकार समोर आला.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाने साईबाबा संस्थानला सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने शिर्डी ग्रामस्थांना दर्शनासाठी ओळखपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. ग्रामस्थांसह आणि भाविकांनाही ओळख पत्राची विचारणा करण्यात येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून शिर्डी देवस्थान हे अति संवेदनशील स्थळांमध्ये येते. अनेक सेलिब्रेटी आणि नेते मंडळी साई बाबांच्या दर्शनासाठी येथे येत असतात. आता साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्याची घटना समोर आल्याने सुरक्षा प्रणाली आणखी चोख करावी लागेल असे दिसत आहे.
पंतप्रधान मोदी यांनी देखील शिर्डीच्या साई बाबांचे दर्शन घेतले होते. कोट्यावधी रूपयांच्या विकीसकांचे त्यांनी लोकार्पण केले होते. साईबाबांच्या दर्शनासाठी तास न् तास दर्शन रांगेत उभे राहाणाऱ्या भाविकांना दिलासा देण्यासाठी. तिरूपतीच्या धर्तीवर 110 कोटी खर्च करून बांधण्यात आलेल्या साई मंदिराच्या अत्याधुनिक दर्शन रांगेचेही त्यांनी लोकार्पण केले होते.