Friendship Day 2023 : आजही दिले जाते श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे दाखले, अशी आहे पौराणिक कथा

| Updated on: Aug 06, 2023 | 8:37 AM

Friendship Day 2023 गरिबीने वेढलेला सुदामा कृष्णाला भेटण्यासाठी द्वारकेला पोहोचला. एका गरिब व्यक्तीला हालाखीच्या अवस्थेत पाहून द्वारपालांनी त्याला अडवले. विचारले - कुठे चालला आहेस? सुदामा म्हणाला - मला कृष्णाला भेटायचे आहे. द्वारपालांनी विचारले राजाशी तुम्हाला काय काम आहे?

Friendship Day 2023 : आजही दिले जाते श्री कृष्ण आणि सुदामाच्या मैत्रीचे दाखले, अशी आहे पौराणिक कथा
श्री कृष्ण आणि सुदामा
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई :  मैत्रीची चर्चा झाली तर श्री कृष्ण आणि सुदामाची आठवण अवश्य होते. कृष्ण आणि सुदामा हे लहानपणापासून चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. या फ्रेंडशिप डेच्या (Friendship Day 2023) निमीत्त्याने आज त्यांच्या मैत्रीबद्दल जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्ण बालपणी सांदीपनी मुनींच्या आश्रमात शिक्षण घेत होते. ब्राह्मण कुटुंबात जन्मलेला सुदामाही याच आश्रमात शिक्षण घेत होता. आश्रमातच कृष्ण आणि सुदामा यांची घट्ट मैत्री झाली. सुदामा हा गरीब ब्राह्मण होता, तर कृष्ण राजघराण्यातील होता. शिक्षण घेतल्यानंतर दोघांनी आश्रम सोडले. असे म्हणतात की सुदामा फक्त पाच घरांतून भिक्षा मागायचा. या पाच घरांतून काहीही न मिळाल्यास हे कुटुंब उपाशी राहायचे. दिवसेंदिवस सुदामाचे कुटुंब गरिबीकडे जाऊ लागले.

पत्नीच्या हट्टामुळे सुदामा श्री कृष्णाकडे मदत मागायला गेला

सुदामाची पत्नी सुशीला त्याला रोज कृष्णाकडे जाऊन मदत मागायला सांगायची. बरेच दिवस सुशीलाने सांगितल्यावर सुदाम्याने द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाला भेटण्याचे ठरविले. सुदामा द्वारकेला पोहोचला. द्वारपालांनी त्यांना अडवले. सुदामा म्हणाला की मी कृष्णाचा बाल मित्र आहे. यावर द्वारपाल महालाच्या आत गेले आणि कृष्णांला सांगितले की, एक साधू तुम्हाला त्याचा बालमित्र असल्याचे सांगत आहे. साधूचे नाव ऐकताच कृष्ण अनवाणी पायाने दरवाजाकडे धावला. वाटेत कृष्णाने सुदामाला मिठी मारली. राजा आणि एका गरीब साधूची मैत्री पाहून सर्वांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.

सुदामाचे पोहे

कृष्णाने सुदामाचा हात धरून मोठ्या प्रेमाने महालात नेले. असे म्हणतात की त्याने आपल्या बालपणीच्या मित्रासाठी आणि जिवलग मित्रासाठी तांदळाचे पोहे घेतले होते, परंतु एवढ्या मोठ्या राजाला भेट म्हणून पोहे देण्यासाठी सुदामाला लाज वाटत होती. शेवटी श्री कृष्णाने सुदाम्याला विचारले मित्रा तू इतक्या दिवसांनी भेटलास तू माझ्यासाठी काय आणले आहे? सुदाम्याने श्री कृष्णाला आपल्या जवळचे पोहे दिले. श्री कृष्णाने ते पोहे त्याच्या समोरच आवडीने खाल्ले. दोघांनी खुप गप्पा मारल्या. सुदामाला मात्र कुठलीच मदत न मागता घराकडे परत जाण्यासाठी निघाला.

हे सुद्धा वाचा

परतीच्या वाटेवर सुदामा घरी गेल्यावर बायकोला काय बोलणार याचा विचार करत होता. पत्नीने कृष्णाला मदत मागण्यासाठी पाठवले होते, पण लाजेमुळे तो मित्राकडून काही मागू शकला नाही. विचार करत असतानाच सुदामा आपल्या घरी पोहोचला, ते दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याच्या तुटलेल्या झोपडीच्या जागी एक सुंदर राजवाडा होता. राजवाड्यातून एक सुंदर स्त्री बाहेर आल्याने सुदामा स्तब्ध झाला. ती सुदामाची पत्नी होती. ती सुदामाला म्हणाली, हा तुझ्या बालमित्र कृष्णाचा प्रताप आहे. त्याने आपले सर्व दु:ख आणि वेदना दूर केल्या. यावर सुदामाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्याला आपल्या जिवलग मित्राची आठवण झाली. एक खरा मित्र आपल्या मित्राच्या मनातले काहीच न सांगता देखील ओळखू शकतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)