सरकारी कार्यालयात किंवा बँकेत आपण अनेक कामांसाठी अर्ज करीत असतो पण भारतात गणपतीचे एक मंदिर असेही आहे जिथे भक्त प्रत्राद्वारे आणि अर्जाद्वारे गणपतीला साकडं घालतात. ऐकून आश्चर्य वाटत असले तरी हे खरं आहे. हजारो वर्षांचा इतिहास असलेले हे गणपतीचे मंदिर (Ganesh temple) आजही भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतो अशी श्रद्धा आहे. हे प्राचीन गणेश मंदिर इंदौर येथील जुनी इंदौरी (Juni Indori) परिसरात स्थित आहे. या मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना असल्याचे स्थानिक सांगतात. इंदौर येथील हे गणेश मंदिर फक्त भक्तांसाठीच नाही तर इतिहासकरांसाठीही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. जुना गणेश मंदिर या नावाने हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध आहे.
जुना गणेश मंदिर हे जुन्या इंदौरच्या दक्षिण तोडा भागातील ऐतिहासिक मंदिर आहे. काळ्या पाषाणात बनलेले हे मंदिर परमार कालीन आहे. हे सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधले गेले असावे असे इतिहासकार सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे देखील या मंदिरात वास्तव्यास होते असे सांगितले जाते. समर्थ रामदासांनीही येथे हनुमानाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती.
या मंदिरातील गणेशाची मूर्ती शेंदुराने माखलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात ही मूर्तीही काळ्या दगडाची आहे. दगडात कोरलेल्या या मूर्तीमध्ये गणेशाला माळवी पगडी परिधान करण्यात आली आहे. यावरून मालवी पगडीची प्रथा फार प्राचीन असल्याचे दिसून येते. चार हात असलेल्या गणेशाच्या दोन हातात अंकुश आणि पाश, एका हातात वरद मुद्रेचा आणि एक हात राजासारखा पायावर ठेवला असल्याने या मूर्तीमध्ये भव्य ऐश्वर्याचेही दर्शन होते.
पुरातत्व विभागाचे डॉ. डी.पी. पांडे सांगतात की, जुनी इंदौर मंदिरावर इतिहासात एकदा नाही तर दोनदा आक्रमण झाले आहे. पहिल्यांदा औरंगजेबाने येथे लुट केली, पण तो मंदिराला धक्का देखील लावू शकला नाही. दुसर्यांदा, सिंधिया सैन्याचा सेनापती घाटगे याने जुनी इंदूरला आग लावली पण गणेश मंदिराचे कुठलेच नुकसान झाले नाही.
आधुनिक जगात मोबाईलमुळे अनेक समस्या दूर झाल्या आहे. जगभरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून संदेश पोहोचविता येणे शक्य आहे, त्यामुळे बाप्पा देखील फोनवरून भक्तांचे गाऱ्हाणे ऐकतो.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)