मुंबई : हिंदू धर्मात अनेक सण साजरे केले जातात, परंतु गणेश उत्सवाचे (Ganeshotsav 2023) स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेशाच्या जयंतीदिनी (Ganesh Jayanti 2023) साजरा केला जातो. 10 दिवस चालणाऱ्या या सणात प्रत्येक घरात गौरीपुत्र गणेशाची स्थापना केली जाते. या दिवसांत भक्तगण पूर्ण विधीपूर्वक 10 दिवस गणपतीची पूजा करतात. त्यानंतर अनंत चतुर्दशीला गणेशमूर्तीचे विसर्जन करून निरोप दिला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला घरात विराजमान केल्याने सर्व बाधा दूर होतात असे मानले जाते. यावेळी लोकांमध्ये तारखेबाबत संभ्रम आहे. गणेश स्थापनेचा नेमका मुहूर्त कोणता आहे ते जाणून घेऊया.
हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12.39 ते मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी दुपारी 12.43 पर्यंत असेल. आता चतुर्थीतिथी दोन दिवसांवर आल्याने गणेश चतुर्थी उत्सवाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र आता 19 सप्टेंबरपासूनच गणेशोत्सव सुरू होणार असल्याची परिस्थिती स्पष्ट झाली आहे. त्याचवेळी गणेश पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11.01 ते दुपारी 01.28 पर्यंत असेल.
गणपतीची स्थापना करण्याकरिता चौरंग किंवा पाट आणि सभोवती मखर. पूजास्थानाच्या वर बांधण्याकरता नारळ , आंब्यांचे डहाळी , सुपाऱ्या. पाण्याने भरलेला तांब्या, पळी , पंचपात्र, ताम्हण, समई, जानवे, पत्री, शेंदूर, विड्याची पाने, सुपाऱ्या, नारळ, फळे, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थ असे पूजा साहित्य घेऊन पूजेची पूर्वतयारी करावी.
गणेश चतुर्थी दिनी प्रात:स्नान-संध्या पूजादी नित्यविधी करावेत. मूर्ती ठेवण्याची जागा स्वच्छ सारवून त्यावर रंगीत पाट मांडून, अक्षता पसराव्यात. यानंतर त्यावर मूर्ती स्थापन करावी व शूचिर्भूतपणे आसनावर बसवून द्विराचमन, प्राणायाम आदी केल्यावर ‘श्रीपरमेश्वप्रीत्यर्थ पाथिर्वगणपतिपूजनमहं करिष्ये’ असा संकल्प म्हणून पाणी सोडावं. कलश, शंख, घंटा व दीप यांचे पूजन करून गंध, अक्षता, पुष्प अर्पण करावं. गणपतीच्या नेत्रांना दुर्वांनी तुपाचा स्पर्श करावा व मूर्तीच्या हृदयाला आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने स्पर्श करून प्राणप्रतिष्ठा करावी.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)