नाशिक : एकीकडे लाडक्या गणरायाला निरोप दिला जात असतांना दुसरीकडे जीवन संपवण्याच्या तयारीत असलेल्या माय-लेकराला पोलीसांनी वाचवलेय. नाशिकच्या ग्रामीण पोलीसांनी हे औदार्य दाखवल्याने त्यांचे कौतुक होत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील सायखेडा पुलावर ही संपूर्ण घटना घडलीय. सायखेडा पोलीसांना एक विवाहित महिला एका चिमूकलीला घेऊन पुलाच्या दिशेने पळतांना दिसले, पुलावर विसर्जनासाठी बंदोबस्तात तैनात असलेल्या महिला पोलीसांनी त्यांना थांबा म्हणून आवाज दिला पण माय-लेक पुढे पळतच होते. याचवेळी पोलीसांनी त्यांच्या माघे धाव घेतली. आणि त्यांना नदीत उडी मारण्यापासून वाचविले. अनंत चतुर्दशीच्या दिवशी ही घटना घडल्याने त्या माय लेकरांच्या मदतीला पोलीसांच्या रूपाने विघ्नहर्ताच धावून आल्याचे एकप्रकारे म्हणता येईल.
संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह राज्यभर बाप्पाला अखेरचा निरोप देण्याची तयारी सुरू होती. पोलीसदल ही नियोजित ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात होते. आणि याच वेळी निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे यागावातील पल्लवी गोरख माळी आपला मुलगा रोहितसह मोठ्या वेगाने पळत होती. कौटुंबिक वादातून ही महिला आपल्या मुलाला घेऊन थेट सायखेडापूलावरून गोदावरी नदीत उडी मारून जिवंत संपविण्याच्या तयारीत होती. पुलाच्या दिशेने जातही होती मात्र तिथेच पोलीसांच्या रूपात बाप्पा धावून आला.
गणेश विसर्जनासाठी पोलिस निरीक्षक कादरी आणि त्यांची टीम सायखेडा पुलावर कार्यरत होती. महिला आपल्या मुलासह धावत असल्याचे पाहून पोलिसांना शंका आली होती. म्हणून लागलीच त्यांनी आत्महतेच्या विचारात असलेल्या महिलेला अडवले. मात्र ती पुढेच पळत राहिल्याने पोलिसांनी तिच्या माघे धाव घेतली. तिला आणि मुलाला पूलावरून पोलिस ठाण्याच्या दिशेने घेऊन गेले. विचारपूस करत तिला समजावून सांगितले. नातेवाईकांना बोलावून तिला त्यांच्या स्वाधीन करण्याचे काम पोलीसांनी केले.
मात्र, यावेळी पोलीसांनी माणुसकी दाखवत या महिलेसह मुलगा रोहितला नवीन कपडे आणि खाऊ घेऊन दिला. खाकीच्या आड असलेली मानसुकी दाखवत सायखेडा पोलीसांनी औदार्य दाखवून एक प्रकारे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. दरम्यान एकीकडे गणेशाला निरोप देण्यासाठी उत्साहाचे वातावरण असतांना अचानक ही घटना घडल्याने पंचक्रोशीत मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र पोलीसांच्या या कार्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.