नाशिक : बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच ओढ असते. बाप्पा आले की सर्वजण मनोभावे पूजा करतात. मोठा उत्साह सर्वत्र बघायला मिळतो. मात्र, बाप्पाला अखेरचा निरोप देत असतांना निष्काळजीपणा दिसून येतो. नाशिक (Nashik) शहरातील गोदाकाठी तब्बल १४४ मेट्रिक टन निर्माल्य आणि १ लाख ९७ हजार मूर्तींचे संकलन ( collection ) करण्यात आले आहे. नाशिक महानगर पालिकेच्या आणि सामाजिक संस्थांच्या मदतीने नदी प्रदूषण रोखण्याच्या प्रयत्नांना मोठे यश आल्याचे बघायला मिळाले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने दरवर्षी केले जाते. मात्र, तरीही नागरिक त्याला फारसा प्रतिसाद देतांना दिसून येत नाही. पाण्यातच निर्माल्य आणि मूर्ती विसर्जित करण्याच्या हट्टामुळे गोदावरी नदी प्रदूषित (pollution ) होते. यंदाच्या वर्षीही १४४ मेट्रिक टन निर्माल्य संकलित केले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी जवळपास 9 सप्टेंबरला गणेश विसर्जनात सुमारे 143.905 मेट्रिक टन निर्माल्य संकलित करण्यात आले आहे. याशिवाय 1 लाख 97 हजार 488 गणेश मूर्तींचेही संकलनाची नोंद देखील झालीय. मूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता मनपाच्या विसर्जन स्थळांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित झाले आहे.
नाशिक महानगर पालिकेत ०६ विभागात ७१ नैसर्गिक, कृत्रिम विसर्जन ठिकाणांवर मूर्ती आणि निर्माल्य संकलित करण्यात आलेय. बांधकाम विभागाने देखील कृत्रिम तलाव उभारले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छतेबाबत नियोजन करून निर्माल्य संकलित केले आहे. मिशन विघ्नहर्ता 2022 फिरता तलाव या उपक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळाला.
निर्माल्य जमा करण्यासाठी सामाजिक संस्थांची देखील मदत झाली आहे. विशेष म्हणजे शालेय संस्थांनी देखील सहभाग घेतला होता. वृक्षवल्ली फाउंडेशन, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, बिटको कॉलेज, दिल्ली पब्लिक स्कूल, के के वाघ संस्था. पोलिस मित्र, लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय, नाशिक रोड गुरुद्वारा, रोटरी क्लब ऑफ गोदावरी, रोटरी क्लब ऑफ वेस्ट, रोटरी क्लब ऑफ नाशिक सिटी, भोसला मिलिटरी स्कुलच्या 100 कॅडेटनी उपस्थित राहून मूर्ती संकलनात सहभाग घेतला होता.
नाशिक महानगर पालिकेच्या सहा विभागाच्या निर्माल्य संकलनाचा तपशील –
पूर्व विभाग – 21290 किलो ग्रॅम
पश्चिम विभाग – 13940 किलो ग्रॅम
नाशिक रोड – 20545 किलो ग्रॅम
पंचवटी विभाग – 36010 किलो ग्रॅम
सिडको विभाग – 22275 किलो ग्रॅम
सातपूर विभाग – 29845 किलो ग्रॅम
एकूण – 143.905 मेट्रिक टन