मुंबई : श्री गणेशाच्या पूजेमध्ये (Ganesh Puja) मोदकांचा नैवेद्य आणि दुर्वा अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की जेव्हा गणपतीचा दात तुटला होता, तेव्हा त्यांना काहीही खाताना खूप त्रास होत होता, तेव्हा त्यांच्यासाठी मुख्यतः मोदक बनवले जात होते. मोदक मऊ असल्याने गणपतीला प्रिय आहेत. गणेशाला 21 मोदक अर्पण करण्याचा नियम आहे. मान्यतेनुसार गणपतीला 21 मोदक एकत्रितपणे अर्पण केल्यास सर्व देवी-देवतांचे पोट भरते. याशिवाय दुर्वा अर्पण केल्याने सुख आणि संपत्ती वाढते. दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते. चला जाणून घेऊया गणपतीला दुर्वा का अर्पण केली जाते? आणि त्यामागची कथा आणि नियम काय आहेत.
एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी अनलासुर नावाचा राक्षस होता, त्याच्या क्रोधामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर कहर झाला होता. अनलासुर हा असा राक्षस होता, जो ऋषीमुनींना आणि सामान्य लोकांना जिवंत गिळत असे. या राक्षसाच्या अत्याचाराने व्यथित होऊन इंद्र, ऋषी-मुनींसह सर्व देवता महादेवाची प्रार्थना करण्यासाठी गेले आणि सर्वांनी महादेवाला अनलासुरची दहशत संपवण्यासाठी प्रार्थना केली.
तेव्हा महादेवाने सर्व देव-देवतांची आणि ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून त्यांना सांगितले की, अनलासुर राक्षसाचा नाश फक्त श्री गणेशच करू शकतो. मग सर्वांच्या प्रार्थनेवरून श्री गणेशाने अनलासुर गिळला, तेव्हा त्यांच्या पोटात खूप उष्णता जाणवू लागली. या समस्येवर अनेक उपाय करूनही गणेशाच्या पोटातील जळजळ कमी होत नसताना ऋषी कश्यप यांनी 21 दुर्वाची जोड बनवून श्री गणेशाला खायला दिल्या. ही दुर्वा श्री गणेशाने स्वीकारली, तेव्हा त्यांच्या पोटातील जळजळ कुठेतरी कमी झाली. तेव्हापासून श्री गणेशाला दुर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाल्याचे मानले जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)