पुणे, गणेशोत्सवासंदर्भात (Ganeshotsav 2022) पुणे पोलीस आयुक्त कार्यालयात मानाच्या आणि प्रमुख गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची बैठक पार पडली. या बैठकीला पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी उपस्थित होते. कोरोना संसर्ग घटल्याने मंडळांची तयारी वेगात सुरू आहे. गेली दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली अत्यंत साधेपणाने साजरा झालेला गणेशोत्सव यंदा मात्र धूमधडाक्यात साजरा होणार आहे. यासाठी पुणे (guidelines) पोलिसांची नियमावली जाहीर झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी काही अटी घातल्या असून, गणेश मंडळांना त्याचे पालन करावे लागणार आहे. मंडळ परवान्यासाठी पोलीस ठाणेस्तरावर एक खिडकी योजना सुरू करण्यात आली असून, अर्ज केल्यानंतर तत्काळ परवाना देण्यात येणार आहे.
मंडळाच्या प्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत पोलीस आयुक्तांनी दिले असले तरी नियमाचे पालन मात्र अनिवार्य असेल. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांसाठीची आचारसंहिता पोलिसांनी जाहीर केली आहे. सुरक्षेसाठी काही अटी जाहीर केल्या आहेत.
मंडप परिसरात येणाऱ्या गणेशभक्तांसाठी आवश्यक त्या सुविधांची काळजी घेणे, मंडपापुढे पोलिसांचे वाहन, अग्निशमन गाड्या, रुग्णवाहिका यांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचण येणार नाही, याची काळजी घेण्याचे सांगण्यात आले असून, विविध प्रकारच्या ‘एकण 39 सूचना करण्यात आल्या आहेत.
परवान्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकारी यांच्या अधिकारांत ‘एक खिडकी’ योजना सुरू करण्यात आली असून, ध्वनिक्षेपकाचा वापर सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या अटींनुसार करावा. ध्वनिक्षेपकाची मर्यादा 2 ओहम व पाच हजार आरएसएम वॅटपेक्षा जास्त क्षमतेची असू नये.
4, 6, 8 आणि 9 सप्टेंबर असे चार दिवस रात्री 12 पर्यंत ध्वनिक्षेपक सुरू राहणार. प्रत्येक मंडळाला जास्तीत जास्त दोन बॉक्स कमानी उभारता येतील. कमानीची उंची 20 फुटांपेक्षा जास्त नसावी. कमानी गणेश मंडळाच्या 100 फुटांच्या आत असाव्यात. बॉक्स कमानीचा जमिनीपासून 10 फुटांपर्यंतचा भाग चेकिंगसाठी खुला असावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.