ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमीला गंगा दसरा (Ganga Dussehra 2022) साजरा केला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी माता गंगा (Ganga river History) पृथ्वीवर अवतरली होती. आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांच्या उद्धारासाठी भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणली होती अशी आख्यायिका आहे. दरवर्षी गंगा दसर्याला भाविक गंगा नदीत श्रद्धेने स्नान करतात. या दिवशी गंगेत स्नान केल्याने 10 प्रकारची पापे दूर होतात अशी मान्यता आहे. यावेळी गंगा दसरा गुरुवार, 9 जून रोजी असून तो पूर्वीपेक्षा अधिक खास असणार आहे. यावर्षी गंगा दसर्याला विशेष शुभ योग जुळून येत आहे. हा विशेष योग रवी योग आहे. या दिवशी सूर्योदयापासूनच रवि योग सुरू होईल. या शुभ योगामध्ये पूजा करणे आणि शुभ कार्य करणे अत्यंत शुभ मानले जाते. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला हस्त नक्षत्रात गंगा पृथ्वीवर अवतरली होती. यावेळी हस्त नक्षत्र 9 जून रोजी पहाटे 4:31 पासून सुरू होईल आणि 10 जून रोजी पहाटे 4:26 पर्यंत चालेल.
यंदा गंगा दसरा गुरुवार, 9 जून 2022 रोजी साजरा केला जाईल. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी गुरुवार, 09 जून रोजी सकाळी 08.21 ला सुरू होईल आणि शुक्रवार, 10 जून रोजी सकाळी 07.25 वाजता समाप्त होईल.
गंगा दसर्याच्या दिवशी पवित्र गंगा नदीत श्रद्धेने स्नान करण्याची परंपरा आहे. जर तुम्हाला गंगेच्या ठिकाणी जाणे शक्य नसेल तर तुम्ही गंगा मातेचे नाव घेऊन जवळच्या तलावात किंवा नदीत स्नान करू शकता. स्नान करताना ‘ओम नमः शिवाय नारायणाय दशहराय गंगाय नमः’ या मंत्राचा जप करावा. नदीवर जाणे शक्य नसल्यास घरीच आंघोळीच्या पाण्यात गंगा जल (Ganga Jal) मिसळवून स्नान करू शकता. गंगा दसर्याच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे. या दिवशी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी 10 वस्तूंचे दान करणे खूप शुभ मानले जाते. पूजा साहित्यात 10 गोष्टींचा वापर करा. फक्त 10 प्रकारची फळे आणि फुले वापरा.
पौराणिक कथेनुसार, प्राचीन काळी अयोध्येत राजा भगीरथ होता. त्यांना भगवान श्री राम यांचे पूर्वज देखील मानले जाते. राजा भगीरथच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी त्यांना गंगा जलात अंत्य कर्म करण्याचे सांगण्यात आले. त्या वेळी गंगा नदी फक्त स्वर्गात वाहायची. भगीरथच्या आजोबांनी आणि वडिलांनी गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी अनेक वर्षे तपश्चर्या केली पण त्यांना यश मिळाले नाही. यानंतर राजा भगीरथही हिमालयात गेला आणि कठोर तपश्चर्येत लीन झाला. एके दिवशी भगीरथच्या तपश्चर्येने गंगादेवी प्रसन्न झाली आणि तिने पृथ्वीवर येण्याची विनंती मान्य केली. पण भगीरथसमोर एक नवा पेच निर्माण झाला. वास्तविक गंगेचा वेग इतका जास्त होता की पृथ्वीवर अवतारताच पृथ्वीचा नाश नाश होण्याचा धोका निर्माण झाला. गंगेचा वेग नियंत्रित करण्याचे सामर्थ्य फक्त महादेव म्हणजेच भगवान शिव यांच्याकडे होते.
राजा भगीरथला हे कळताच त्यांनी शिवाची तपश्चर्या सुरू केली. सुमारे वर्षभर एका पायाच्या बोटावर उभे राहून त्यांनी काहीही न खाता शिवाची पूजा केली. भगवान शिव त्यांच्या तपश्चर्येवर प्रसन्न झाले आणि त्यांनी गंगाला पृथ्वीवर आणण्यासाठी मदत करण्याची विनंती मान्य केली. त्यानंतर ब्रह्माजींनी आपल्या कमंडलातून गंगेचा प्रवाह निर्माण केला. भगवान शिवने तो प्रवाह आपल्या जटेत शोषून घेतला. सुमारे 32 दिवस गंगा नदी महादेवाच्या जटेत फिरत राहिली. त्यानंतर ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी महादेवाने आपली एक जटा मोकळी केली आणि गंगा पृथ्वीवर अवतरली. भगीरथने हिमालयाच्या दुर्गम पर्वतांमधून गंगा नदीसाठी मार्ग मोकळा केला आणि तिचे पाणी मैदानी परिसरात प्रवाहित होण्यासाठी मदत केली. यानंतर राजा भगीरथने आपल्या पूर्वजांना गंगेचे जल अर्पण करून मुक्त केले, अशी आख्यायिका आहे.
(वरील माहिती धार्मिक मान्यतेनुसार देण्यात आलेली आहे. याचा कुठलाही वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. अंधश्रद्धेला दुजोरा देण्याचा कुठलाच हेतू नाही)