मुंबई : भारतात अशी अनेक मंदिरे आहेत, जी ज्यांच्या प्रथा, परंपरा आणि इतिहास खूप वेगळा तितकाच आश्चर्यकारकही आहे. असेच एक अनोखे मंदिर मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील मानक येथे आहे. सहसा इतर मंदिरांमध्ये भक्तांना प्रसाद म्हणून मिठाई किंवा काही खाद्य पदार्थ दिले जातात, पण महालक्ष्मीच्या या मंदिराची (Ratlam Mahalakshmi Temple) खास गोष्ट म्हणजे येथे भाविकांना प्रसादाच्या रूपात दागिने मिळतात. तेही चक्क सोन्या चांदीचे. या मंदिरात येणारे भाविक सोन्या-चांदीची नाणी घेऊन घरी जातात. प्रसाद म्हणून सोने चांदी दिल्या जाणारे हे मंदिर नेमके भक्तांसाठी कधी खुले असते हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेलच.
महालक्ष्मीच्या या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते. येथे भाविक येतात आणि कोट्यवधी रुपयांचे दागिने आणि रोख रक्कम मातेच्या चरणी अर्पण करतात. दिवाळीनिमित्त या मंदिरात धनत्रयोदशीपासून पाच दिवस दीपोत्सवाचे आयोजन केले जाते. यावेळी मंदिर फुलांनी नव्हे तर भाविकांनी अर्पण केलेल्या दागिन्यांनी आणि रूपयांनी सजवले जाते. दीपोत्सवादरम्यान मंदिरात कुबेरचा दरबार आयोजित केला जातो. यादरम्यान येथे येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून दागिने आणि पैसे दिले जातात.
दिवाळीच्या दिवशी या मंदिराचे दरवाजे 24 तास उघडे असतात. असे म्हणतात की धनत्रयोदशीला येथे महिला भक्तांना कुबेराची पोतली दिली जाते. येथे आलेला कोणताही भाविक रिकाम्या हाताने परत जात नाही. काही ना काही त्यांना प्रसादाच्या स्वरूपात दिले जाते. मंदिरात दागिने आणि पैसा अर्पण करण्याची परंपरा अनेक दशकांपासून सुरू आहे. पूर्वी येथील राजे राज्याच्या उत्कर्षासाठी मंदिरात पैसे वगैरे अर्पण करायचे आणि आता भाविकांनीही इथल्या देवीच्या चरणी दागिने, पैसा वगैरे अर्पण करायला सुरुवात केली आहे. असे मानले जाते की असे केल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव त्यांच्यावर राहते.
या मंदिरात पैसे आणि दागिणे ठेवण्यासाठी जागा अपूरी आहे. इथे किती पैसा येतो, किती दागिने येतात, याचा अंदाज येत नाही. हा कुबेराचा खजिना आहे. इथे पैसे ठेवायला जागा नाही. सगळी तिजोरी भरली असली तरी पैसे ठेवायला जागा नाही. खजिना सोने, चांदी आणि नोटांनी भरला असल्याचे पुजारी सांगतात. पुष्य नक्षत्रापासून लोकं येथे पैसे आणून ठेवतात. दिवाळीनिमित्त तीन दिवस पूजा केली जाते. येथे पैसे जमा करणाऱ्यांना टोकन दिले जाते. हे मंदिर जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत आहे. प्रशासनाकडून पूर्ण देखरेख केली जाते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)